शिवसेनेच्या ‘या’ तीन माजी नगरसेवकांना सक्तमजुरी

103
अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू असताना महापालिकेच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डोंबिवलीच्या नगरसेवकांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा निर्णय कल्याण अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. माजी नगरसेवक सदानंद थरवळ, शरद गंभीरराव आणि तात्यासाहेब माने या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांना न्यायालयाने २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडांची शिक्षा सुनावली आहे. कल्याण अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला माजी नगरसेवकाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.

सरकारी कामात अडथळा निर्माण

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या स्वर्गीय सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बेकायदेशीर दुकाने महानगरपालिकेकडून तोडण्याची कारवाई सुरू असताना डोंबिवलीतील शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक सदानंद थरवळ, शरद गंभीरराव आणि तात्यासाहेब माने यांनी विरोध करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. हा प्रकार १५ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात तत्कालीन मनपा उपायुक्त रवींद्र वाघ यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी थरवळ, माने आणि गंभीरराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

अंतिम सुनावणी शुक्रवारी पार पडली

मागील पंधरा वर्षांपासून हा खटला कल्याण जिल्ह्या सत्र न्यायालय या ठिकाणी सुरू होता. या खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारी पार पडली. या वेळी न्यायाधीश एस.एस. गोरवाडे यांनी या माजी नगरसेवकांना दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील ऍड. सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी नगरसेवकाकडून अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.