कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी शिंदे गटातील मंत्री, आमदार, खासदार आणि नेतेमंडळी शनिवारी सकाळी गुवाहाटीला रवाना झाली. मात्र, पूर्वनियोजित असलेल्या या दौऱ्याला चार मंत्री, तीन आमदार आणि एका खासदाराने दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – … म्हणून आम्ही कामख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जातोय, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले)
सुरुवातीला २१ नोव्हेंबरला गुवाहाटी दौरा निश्चित करण्यात आला होता. मात्र, काही नेत्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम लक्षात घेऊन सगळ्यांच्या सोयीनुसार २६ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. असे असताना दौऱ्याची तारीख बदलल्यानंतरही काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोणी मारली गुवाहाटी दौऱ्याला दांडी
दांडी मारणाऱ्या नेत्यांमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, महेश शिंदे, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा समावेश आहे. यापैकी काही नेत्यांनी वैयक्तिक कारण देऊन या दौऱ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही मंत्री त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत.
कोणी काय कारणे दिली?
– मंत्री अब्दुल सत्तार नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे कृषी प्रदर्शन असल्याने आपल्याला गुवाहाटीला जाता येणार नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.
– जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमुळे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत.
– मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे महत्त्वाची कामे आणि लग्न समारंभामुळे गुवाहाटीला जाणार नाहीत.
– आरोग्य मंत्री तानाजी सावंत शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत पुण्यात आहेत. २७ आणि २८ तारखेला त्यांच्या परंडा मतदारसंघात आरोग्य शिबीर असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत.
– मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरात मंगलकार्य असल्याने ते कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार नाहीत.
– तर कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द केल्याची माहिती दिली.