दादरच्या टिळक भवनातील काँग्रेस कार्यालयात गेल्या शनिवारी युवक काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने खुर्च्या भिरकावत विद्यमान अध्यक्षांविरोधात रोष व्यक्त केला होता. या राडेबाजीप्रकरणी काँग्रेसने संबंधितांवर कारवाई केली असून, चार पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
प्रदेश उपाध्यक्ष तनवीर विद्रोही आणि सचिव इरशाद शेख यांचा निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे. शनिवारी युवक काँग्रेसच्या या बैठकीदरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात काही कार्यकर्ते परस्परांमध्ये भिडले.
(हेही वाचा – आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले…)
चौकशी होणार
या बैठकीला युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास हेसुद्धा उपस्थित होते. नाराज होऊन ते तत्काळ दिल्लीला निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी चार पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून राडेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तनवीर विद्रोही, इरशाद शेख यांच्यासह कराड दक्षिणचे अध्यक्ष दिग्विजय पाटील आणि प्रदेश सचिव उमेश पवार यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे. बी.वी. श्रीनिवास यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community