महाराष्ट्राला ठेंगा; फॉक्सकॉन कर्नाटक आणि तेलंगणात करणार मोठी गुंतवणूक

140

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी आरोपांचे रान उठवले होते. त्यांनतर यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्या घोषणेला सहा महिने होत नाहीत तोवर फॉक्सकॉनने महाराष्ट्राला ठेंगा दाखवत कर्नाटक आणि तेलंगणात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

फॉक्सकॉनने आपले इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्सरींग हब तेलंगणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी तेलंगण सरकारशी करारही केला आहे. त्यातून एक लाख रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती ट्वीटद्वारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतीच दिली.

त्यापाठोपाठ कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फॉक्सकॉनचा ‘आयफोन’ निर्मिती प्रकल्प कर्नाटकमध्ये सुरू होणार असल्याचे ट्वीट केले आहे. कर्नाटकमध्ये ३०० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ७० कोटी डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून एक लाख रोजगार निर्मिती होईल, असा दावाही बोम्मई यांनी केला आहे.

(हेही वाचा आता कपिल सिब्बल तिसऱ्या आघाडीसाठी घेणार पुढाकार; काय आहे अजेंडा?)

आश्वासन हवेत विरले?

महाराष्ट्रात पुण्यामध्ये येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पातून राज्यात दीड लाख रोजगार निर्मिती झाली असती. त्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली होती. त्यावेळी त्याच ताकदीचा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र, आजपावेतो असा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली सुरू असल्याचे दिसून येत नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.