आधी बेस्टला अनुदान देत महापालिकेची तिजोरी रिकामी करणाऱ्या शिवसेनेकडून आता राज्यातील मोफत लसीकरणाचा भारही महापालिकेनेच वाहावा अशी मागणी होत आहे. राज्यातील सर्व नागरीकांना कोरोनाची मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेची आर्थिक मदत घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी महापालिकेच्या ७९ हजार कोटींचा मुदत ठेवींच्या रकमेवर बोट दाखवले आहे.
खासदार राहुल शेवाळे यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र!
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर बनलेली असून मुदत ठेवीतील रक्कमही भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांसाठी कमी पडणार आहे. परंतु मुंबई महापालिकेला राज्यातील जनतेच्या मोफत लसीकरणाची भार वाहायला लावून एकप्रकारे शिवसेना मुंबई महापालिकेला भिकारी बनवून पाहत आहे की, काय प्रश्न उपस्थित हात आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून १८ वर्षांवरील वयोगटातील नागरीकांसाठी राज्य सरकारमार्फत मोफत लस देण्यात यावी. यासाठी साधारणत: साडेपाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. देशातील सगळ्यात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महानगर पालिकेकडे सध्या सुमारे ७९ हजार कोटींच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये पडून आहेत. त्या निधीचा वापर करावा आणि हा निधी काही वर्षांनी परत करावा, असे पत्रात म्हटले आहे.
(हेही वाचा : अचानक मृत्यू झाल्यास ‘या’ सराकरी विमा योजनांमार्फत मिळू शकतो लाभ!)
महापालिकेच्या मुदत ठेवींवर डोळा!
मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींकडे सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असून या मुदत ठेवींमधील भविष्य निर्वाह, निवृत्ती वेतन, कंत्राटदारांच्या संरक्षित निधी आदींसाठीचा राखीव निधी हा २६ हजार ३८२ कोटी रुपयांचा आहे. तर पायाभूत मोठ्या विकास प्रकल्पांसाठीच येणारा अपेक्षित खर्च हा ७९ हजार ८२९ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे ठेवीतील सध्या महापालिकेला केवळ ५३ हजार कोटी रुपयेच वापरता येणार असून हा निधी वापरला तरीही विविध प्रकल्पांसाठी महापालिकेला सुमारे २६ हजार कोटी रुपयांची मोठी तूट जाणवणार आहे.
शेवाळेंच्या विरोधात नाराजीचा सूर!
राहुल शेवाळे महापालिकेच्या स्थायी समितीचे चार वेळा अध्यक्षपदी राहिलेले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष असतानाच ते मोदी लाटेमध्ये खासदार बनले. मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीची त्यांना पूर्ण कल्पना आहे. परंतु आता आपण नगरसेवक नाही तर खासदार झालो म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला अशा अविभार्वात शेवाळे यांनी ही मागणी करत महापाालिकेला कशाप्रकारे भिकारी बनवता येईल याचाच विचार केलेला दिसतो, असेच बोलले जात आाहे. शेवाळे हे खासदार असून राज्याचा अडकलेला जीएसटीचा निधी राज्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. पण तो प्रयत्न न करता महापालिकेच्या मुदतठेवीतील रकमेवर सरकारचे कशाप्रकारे लक्ष जाईल याचा विचार केलेला आहे. त्यामुळे ही मागणी महापालिकेला आर्थिक कमजोर करणारी असल्याचेही महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.
शेवाळे यांच्या मागणीवर विरोधी पक्षनेते नाराज
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी, राज्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना १ मे पासून मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडून पैसे घ्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्य सरकारने नंतर मुंबई महापालिकेचे पैसे परत करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र या मागणीशी आपण सहमत नसल्याचे सांगत असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईकरांचे लसीकरण व त्यांचा कोविड उपचारावरील संपूर्ण खर्च हा मुंबई महापालिकेनेच आतापर्यंत केला आहे, करीत आहे व यापुढेही करीत राहील. वास्तविक, केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे जीएसटी पोटी २४ हजार कोटी रुपये थकीत आहेत. केंद्र सरकारने ते थकीत २४ हजार कोटी रुपये राज्याला तातडीने दिले तर राज्यातील जनतेला कोविडबाबत अधिक चांगल्या सेवासुविधा देता येतील. राज्य सरकार जनतेला सर्व आरोग्य सुविधा, लस मोफत देईल. त्यामुळे खा. शेवाळे यांनी, प्रथम केंद्र सरकारकडे निधीची मागणी करावी, त्यास आम्ही नक्कीच समर्थन देऊ, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community