मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी प्रवेश केला. विश्वासराव यांच्या जीवलग मैत्रीणी असलेल्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि माजी नगरसेविका सुवर्णा करंजे या आधीपासूनच शिवसेनेत आहे. म्हात्रे, करंजे आणि विश्वासराव यांची महापालिकेत घट्ट मैत्री होती. त्यामुळे आधीपासूनच शिवसेनेत असलेल्या म्हात्रे आणि करंजे यांच्या जोडीला आता विश्वासराव पक्षात सामील झाल्याने महापालिकेतील या मैत्रीचा त्रिकोण आता शिवसेनेतही पहायला मिळणार आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांसह पदाधिकारी यांनी बाहेर पडून शिवसेनेवरच दावा केला आहे. निवडणूक आयोगानेही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धनुष्यबाण बहाल करत खरी शिवसेनाच असल्याचे सांगितले. त्यानंतर आता शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितत प्रवेश केला.
(हेही वाचा – Mumbai Police : मुंबई पोलीस दलात शिपाई संवर्गाची १० हजार पदे रिक्त)
तृष्णा विश्वासराव या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या, तर मागील २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव काँग्रेसच्या सुफियान वणू यांनी केला होता. तृष्णा विश्वासराव यांना काठावर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे शिवसेनेने त्यांना महापालिकेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून पाठवले होते. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेकडून दहिसरमधून शीतल म्हात्रे आणि भांडूप-कांजूरमार्ग मधून सुवर्णा करंजे या निवडून आल्या होत्या. त्यामुळे मागील महापालिकेत म्हात्रे,करंजे आणि विश्वासराव यांची घट्ट मैत्री पहायला मिळत होती. महापालिकेत नगरसेवक असताना या तिघींची घट्ट मैत्री सर्वांनाच परिचित होती.
परंतु शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत शीतल म्हात्रे यांनी प्रवेश केल्यानंतर काहीसा संपर्क दुरावला होता. पण मागील महिन्यांमध्ये सुवर्णा करंजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हात्रे आणि करंजे यांच्यातील मैत्री पुन्हा पहायला मिळाली. त्यामुळे त्या दोघींच्या मैत्रीपासून तृष्णा विश्वासराव दूर होत्या. परंतु आता त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या तिघांची मैत्री पुन्हा एकदा शिवसेनेत पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे तृष्णा विश्वासराव या शिवसेनेत प्रवेश करण्याची जोरदार चर्चा होती, परंतु विभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झाल्यास त्याठिकाणी तिकीट मिळणे दूर असल्यानेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community