शिवसेना-भाजपा…25 वर्षांहून अधिक काळ हे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत राहिले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. मात्र आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षाचे मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात जरी हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात असले तरी औरंगाबादमध्ये मात्र शिवसेना-भाजपा युतीचे संकेत मिळत आहेत.
म्हणून शिवसेना-भाजपा युतीची चर्चा
शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या भाजपा शहाराध्यक्षांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादचे भाजपा शहराध्यक्ष संजय केनेकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेत युतीचे संकेत दिले होते. सगळ्या महत्वाचे म्हणजे औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपा नेते महापालिकेत युतीसाठी इच्छुक आल्याची सूत्रांची माहिती आहे.
(हेही वाचा : मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात १ हजार कोटींचा दावा!)
असे आहे पक्षीय बलाबल
- शिवसेना – 28
- भाजप – 22
- एमआयएम – 25
- काँग्रेस – 10
- राष्ट्रवादी – 03
- इतर – 25
याआधीही मिळालेले संकेत
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, एमआयएम खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी युतीचे संकेत देणारी एकामागोमाग एक वक्तव्ये केली. माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे. मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यांनाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, तेव्हा दानवे म्हणाले की, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. ते २५ वर्षे आमच्यासोबत होते. त्यामुळे काही वेळ जाऊ द्यावा, सर्व सुरळीत होईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community