एसटीच्या मागे साडेसाती! मागील १० वर्षांत किती वेळा झाला संप?

आर्थिक नुकसान सोसूनही महामंडळाचा कारभार सुरु आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी वारंवार संप करण्याची वेळ येत आहे.

मागील ५ वर्षांमध्ये दरवर्षी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला. तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांनी यंदाच्या वर्षीही २७ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा बेमुदत संप सुरु केला आहे. विशेष म्हणजे हा संप ८ नोव्हेंबरपासून राज्यभरातील आगारांमध्ये शंभर टक्के यशस्वीपणे सुरु आहे. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला २०० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. मात्र यावेळीची कर्मचाऱ्यांची लढाई आर या पार स्वरूपाची आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या नेहमीप्रमाणे वेतनवाढ, महागाई भत्ता अशा मागण्या नाहीत, तर महामंडळाचेच राज्य सरकारमध्येच विलीनीकरण करून कायमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आहे.

राज्य परिवहन महामंडळ ना नफा ना तोटा या धर्तीवर परिवहन सेवा देणारी निमशासकीय संस्था आहे. गाव तिथे एसटी हे ब्रीद सरकारने एसटीला आखून दिले, त्यामुळे दुर्गम भागात एका शाळकरी मुलासाठीदेखील एसटीच्या फेऱ्या अनेक ठिकाणी सुरु आहेत. ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, शाळकरी विद्यार्थी इत्यादींना सवलती दिल्या जातात. अशा प्रकारे आर्थिक नुकसान सोसूनही महामंडळाचा कारभार सुरु आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी वारंवार संप करण्याची वेळ येत आहे.

(हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय फेटाळला! संप चिघळला)

मागील १० वर्षांत झालेले संप!

१७ डिसेंबर २०१५

वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्त्यात वाढ करावी या मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी १७ डिसेंबर २०१५ रोजी बेमुदत संप केला. हा संप २ दिवसांचा होता. त्यावेळी महामंडळाचे २ दिवसांचे २० कोटी रुपये नुकसान झाले होते. महामंडळाच्या सर्व कामगार संघटनांनी या संपात सहभाग घेतला होता.

१६ ऑक्टोबर २०१७

महामंडळाच्या कामगार कृती समितीने १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरु केला. यावेळीही वेतनवाढीच्या मागणीसाठी हा संप करण्यात आला होता. ऐन दिवाळीत हा बेमुदत संप केला होता. हा संप तब्बल ५ दिवस चालला. त्यामुळे महामंडळाला या संपामुळे १०० कोटींहून अधिक आर्थिक नुकसान झाले. त्यावेळी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र लवकर यश आले नाही. त्यामुळे हा विषय मुंबई उच्च न्यायालयात पोहचला.

८ जून २०१८

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जून २०१८ रोजी मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरु केला. हा संप दोन दिवस चालला. राज्यभरातील २५० आगारांतून हा संप झाला. त्यामुळे ३३ कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागले. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता.

२८ मे २०१९

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २८ मे २०१९ रोजी मध्यरात्री बेमुदत संप सुरु केला. हा संप ३ दिवस संप सुरु होता. त्यामुळे ४५ कोटी रुपयांचे महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. वेतनवाढ आणि महागाई भत्ता या मागणीसाठीच हा संप केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here