शरद पवार (Sharad Pawar) सध्या 82 वर्षांचे आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच कुणाला पाडायचे, पक्ष कसा फोडायचा हेच धोरण राबवले. आम्ही फोडाफोडीचे राजकारण त्यांच्याकडूनच शिकलो. आताही त्यांनी घरफोडीचा जो कार्यक्रम सुरू केला आहे. ते आता नेत्यांची घरे फोडत आहेत. त्यांच्याकडून हे नाही तर लोकशाही मार्गाने राजकारण करणे अपेक्षित आहे, अशा शब्दांत राज्याचे मंत्री धर्मराव आत्राम यांनी शरद पवारांवर केला.
शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांवर उपरोक्त टीका केली. माझ्याविरोधात माझी मुलगी भाग्यश्रीला उमेदवारी मिळण्याविषयी संभ्रमावस्था आहे. विशेषतः ती आपल्या वडिलांना आव्हान देईल का? हा ही प्रश्न आहे. माझी यंदा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. पण लोकांच्या आग्रहास्तव मी ही शेवटची निवडणूक लढवणार आहे, असेही आत्राम म्हणाले.
(हेही वाचा Rahul Gandhi: संसदेतील भाषणानंतर राहुल गांधींचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, ट्विट करत म्हणाले…)
मागील 5 वर्षांत मी माझ्या मतदारसंघात चांगली कामे केली. सध्या आमची विदर्भातील 20 जागांवर लढण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार लवकरच विदर्भात येऊन या जागांची चाचपणी करतील. लोकसभेत जे घडले ते यावेळी विधानसभेला घडू देणार नाही. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे मंत्री आत्राम म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 90 जागांवर लढण्याची तयारी करत आहे. यापैकी 10 ते 15 टक्के जागांवर पक्ष तरुण उमेदवार देईल. पण उमेदवार देताना त्यांचे मतदारसंघातील कार्य, संपर्क व पक्षाची ताकद या तिन्ही गोष्टींचा विचार केला जाईल, असेही आत्राम म्हणाले.
Join Our WhatsApp Community