कळवा येथील वाय जंक्शन पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी श्रेयवादाच्या लढाईसोबतच या तिन्ही नेत्यांमध्ये काही शाब्दिक टोलवाटोलवी झाल्याचेही पहायला मिळाले. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्या एका विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हसत त्यांच्या पाठीत धपाटा घातला.
काय झाले नेमके?
दोन प्रमुख मागण्या आम्ही पूर्वीपासून करत आहोत. एक रस्ता उजवीकडे कळव्यात उतरतो. तर तिथेच डावीकडून जाणारा रस्ता महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे हा रस्ता जर महामार्गाला जोडला तर खारेगाव टोलनाक्यापर्यंत प्रवाशांना सहज जाता येईल त्यामुळे कळव्याची वाहतूक कोंडी पूर्णपणे बंद होईल. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता मागणी केली आहे, असे आव्हाड यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः ‘प्रकल्प आव्हाडांच्या पैशांनी पूर्ण झालेला नाही’, कळवा पुलाच्या उद्घाटनावेळी शिंदे-आव्हाडांत रंगला श्रेयवाद)
…आणि मुख्यमंत्र्यांनी घातला धपाटा
पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाच वर्षांपूर्वीच मागणी केली होती, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मधली अडीच वर्ष महाविकास आघाडीने काय केलं, असा सवाल आव्हाडांना केला. त्यावेळी आव्हाडांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. मधली अडीच वर्ष कोविड होता ना, असं उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नाला दिलं. त्यानंतर एकच हशा पिकला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीत प्रेमळ धपाटा घातला.
Join Our WhatsApp Community