राज्यात शिंदे सरकार येताच शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याजवळ असलेल्या महापालिकेतील विभागीय सहाय्यक आयुक्ताची प्रथम बदली करण्यात आली आहे. शिवसेनेतील शिंदे गटात सामील झालेल्या आमदार सदा सरवणकर यांनी जी- उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र सरकार येताच दिघावकर यांची बदली करत सदा सरवणकर यांनी सेनेला जोरदार झटका दिला. दिघावकर यांच्या जागी के /पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दिघावकर यांची बदली ई- विभागामध्ये करण्यात आली आहे.
म्हणून दिघावकर यांची बदली
राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारमधील पर्यावरण आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील काही सहाय्यक आयुक्त होते. ज्यामध्ये जी -दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि डी- विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आदींचा समावेश होता. यापैकी उघडे आणि दिघावकर हे आदित्य ठाकरे यांच्या विविध योजना आणि संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील असायचे आणि आदित्य ठाकरे यांच्या अगदी जवळ असल्याने दिघावकर आणि उघडे यांच्याकडून शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांवरच अन्याय केला जात होता, अशी जाहीर नाराजी बऱ्याचदा त्यांच्या नगरसेवकांडून व्यक्त केली जायची. हे सहाय्यक आयुक्त ऐकत नव्हते. त्यामुळे दोन्ही विभागातील नगरसेवकांची तीव्र नाराजी या सहाय्यक आयुक्तांवर होती. तर जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त हे आदित्य आणि सभागृह नेत्या विशाखा गावत यांच्याजवळ असल्याने ते स्थानिक आमदार सदा सरवणकर यांना कोणतीही मदत करत नव्हते. दरम्यान, भागोजी की स्मशानभूमी कार्यशाळेत केलेल्या वाढीव बांधकामावर महापालिकेच्या मदतीने दिघावकर यांनी कारवाई केली होती. शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फायदा घेत हे अधिकारी वावरत असून याबाबत शिंदे गटात सामील झाल्यावर सरवणकर यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिघावकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, ४ जुलै २०२२ रोजी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या स्वाक्षरीने तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये किरण दिघावकर यांची बदली ‘ई’विभागात करून शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. तर दिघावकर यांच्या जी – उत्तर विभागाचे के -पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती केली आहे. तर ई- विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांची बदली के -पूर्व विभागात करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community