अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ हे कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या G20 परिषदेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. (G20 Summit Delhi) सांचेझ हे G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार होते, परंतु कोरोनाची लागण झाल्यामुळे आता त्यांच्या जागी स्पेनचे उपराष्ट्रपती आणि परराष्ट्रमंत्री येणार आहेत.
(हेही वाचा – G-20 Summit : भारताच्या जी-20 परिषदेत अनेक नवीन उपक्रम आणि यशोगाथांना दिली चालना, राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीपूर्वी घेतला आढावा)
ट्विटरवर माहिती देताना सांचेझ म्हणाले की, सध्या मला बरे वाटत आहे. आज दुपारी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी G20 शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीला येऊ शकणार नाही. ते म्हणाले की, G20 शिखर परिषदेत स्पेनचे प्रथम उपाध्यक्ष नादिया कॅल्विनो सांतामारिया आणि परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बेरेस हे प्रतिनिधित्व करतील.याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही G20 परिषदेला येण्याविषयी असमर्थता दर्शवली आहे. त्यांच्याऐवजी चीन आणि रशियाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (G20 Summit Delhi)
हे नेते आणि देश होणार सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या परिषदेची जय्यत तयारी राजधानी दिल्ली येथे सुरु आहे. जागतिक पातळीवरचे अनेक नेते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेत्यांसोबत 15 द्विपक्षीय बैठका घेऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन, हे नेते G20 शिखर परिषदेला उपस्थित रहाणार आहेत.
जी-20 सदस्यांव्यतिरिक्त भारताने बांगलादेश, नेदरलँड, नायजेरिया, इजिप्त, मॉरिशस, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. या शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सर्वोच्च प्रशासकांचाही सहभाग असेल.
शनिवारपासून नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-20 शिखर परिषद सुरू होणार असून जागतिक मुद्द्यांवर अनेक चर्चा होणार आहेत. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्लीला रवाना झाले आहेत. बायडेन संध्याकाळी 6.55 वाजता दिल्लीला पोहोचतील. (G20 Summit Delhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community