छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात इस्लामिक अतिक्रमण झाले आहे. ही धार्मिक स्थळे असल्याचे अलीकडे ठासून सांगितले जाते. परंतु, इस्लामी धर्मग्रंथानुसार कबरी, दर्गे, मदारी, मशिदी यांची पूजा करण्यास मनाई आहे. त्यामुळे आमच्या गडकिल्ल्यांवर केलेल्या अतिक्रमणांना धार्मिक म्हणण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. ती अधार्मिकच आहेत, असा हल्लाबोल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी शुक्रवारी केला.
राज्यातील गड-दुर्गांवर झालेल्या अतिक्रमणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने शुक्रवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. फोर्टमधील मेट्रो सिनेमागृहाजवळून सुरू झालेला या मोर्चाचे आझाद मैदानात विराट सभेत रूपांतर झाले. या वेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना रणजित सावरकर बोलत होते. शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
रणजित सावरकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांवर अनेक वर्षांपासून अतिक्रमणे सुरू आहेत. ती हटवण्यासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागतात. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, १९४७ पासून हिंदूंच्या मतांवर निवडून येणारे सरकार आमच्या मानदंडाचे, प्रतिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतं आणि आम्ही त्याच्याविरुद्ध काहीही करीत नाही.’
‘ही जी वेळ आपल्यावर आलेली आहे, त्याला आपण स्वतः कारणीभूत आहोत. त्याला कारण म्हणजे आपल्यात असलेली एक सद्गुण विकृती. आपण शत्रूशीही अतिशय औदार्याने वागतो आणि तो त्याचा फायदा घेऊन आपल्याच उरावर बसतो. जेव्हा इस्लामिक अतिक्रमणे हटवण्याची वेळ येते, तेव्हा आपल्यातील काहींना वाटते की काय हा हिंदू-मुस्लिम वैरभाव सुरू आहे. ही त्यांची पवित्र स्थळे आहेत, असे अनेकजण सांगतात. परंतु, कुराणमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की दर्गे, मदारी, मशिदी धार्मिक नाहीत. त्या फक्त उपयुक्त गोष्टी आहेत. याउलट आमची मंदिरे पवित्र असतात; कारण तिथे देवांची प्रतिष्ठापना होते. त्यामुळे तेथे देव तत्वाचे वास्तव्य असते. म्हणून आम्ही त्याची पूजा करायला जातो,’ असे रणजित सावरकर म्हणाले.
सौदी अरेबियाने ९८ टक्के धार्मिक स्थळे तोडली
- सौदी अरेबियाने मक्कामधील मोहम्मद पैगंबराच्या मुलीची कबर १८०३ साली तोडली. तेव्हापासून आतापर्यंत मशिदी, कबरी, दर्गे, मदारी मिळून ९८ टक्के धार्मिक वास्तू तोडून टाकल्या आहेत. कारण त्यांच्या मते पार्थिवाची पूजा करायला इस्लाममध्ये परवानगी नाही. त्यामुळे आपण जे म्हणतो मशीद अल्लाचे घर आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही.
- मोहम्मद पैगंबराची जी पहिली बायको होती, तिचे घर यांच्यासाठी पवित्र असायला हवे होते. पण मक्क्यामधील या घराच्या जागेवर त्यांनी स्वच्छता गृह उभे केले आहे. त्यामुळे अजिबात मनात आणू नका की कोणाच्याही पूजा स्वातंत्र्यावर आम्ही घाला घालीत आहोत. आम्ही जी मागणी करीत आहोत ती रास्त आहे.
- पूजेचे स्वातंत्र्य प्रत्येक धर्मात आहे. पण त्यासाठी जी जागा लागते, ती तुमच्या मालकीची असावी, नसल्यास कायदेशीर रित्या विकत घ्या. अतिक्रमण करण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यामुळे तुमची नाटकं आम्ही ऐकून घेणार नाही, असा हल्लाबोलही रणजित सावरकर यांनी केला.
(हेही वाचा – क्रांतियुद्धाच्या मंदिराचा वीर सावरकरांनी रचला पाया, सुभाषचंद्र बोसांनी कळस ठेवला – रणजित सावरकर)
Join Our WhatsApp Community