गडकरी, फडणवीस, मुनगंटीवार, बावनकुळेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला उमेदवार मिळेना

98

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात भाजपाला उमेदवार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी त्यांना अन्य पॅनलच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील मगर तलावातून पुन्हा मिठी नदीत?)

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर आमदारांपैकी पाच सदस्यांची मुदत ७ फेब्रुवारीला संपत आहे. त्यासाठी ३० जानेवारीला मतदान आणि २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, भाजपाने अद्याप नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. कॉंग्रेसला टक्कर देईल असा उमेदवार मिळत नसल्याने भाजपासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसनेही अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

स्वपक्षाचा उमेदवार मैदानात उतरवण्याऐवजी शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह भाजपात आहे. कारण, नागपूर पदवीधर निवडणुकीत कॉंग्रेसने धोबीपछाड दिल्यामुळे भाजपाकडून सावध पावले उचलली जात आहे. मात्र, भाजपाच्या पाठिंब्यावर गाणार १२ वर्षे आमदार राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांनाच पाठिंबा देण्यास काही नेत्यांचा विरोध आहे. यावेळी इतरांना संधी द्यावी, असा सूर या नेत्यांचा आहे. परिणामी उमेदवार देण्यावरून दोन मतप्रवाह असल्याने अद्याप निर्णय न झाल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

भाजपाच उमेदवार असे…

  • कोकण शिक्षक मतदारसंघ – ज्ञानेश्वर म्हात्रे
  • औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ – किरण पाटील
  • अमरावती पदवीधर मतदारसंघ – रणजीत पाटील
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.