गजानन काळेंना होणार अटक, पोलिसांची शोधाशोध सुरु!

गजानन काळे यांच्या पत्नीने नेरूळ पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

102

मनसेचे नवी मुंबईतील शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर सोमवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत तात्काळ अटकेची मागणी केली. त्यानंतर आता नवी मुंबई पोलिसांकडूनही गजानन काळे यांच्या विरोधात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे गजाजन काळे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काळेंच्या विरोधात वाढला राजकीय दबाव!

पोलिसांकडून आता काळे यांच्या विषयी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे दिसत आहे. गजानन काळे यांच्या पत्नीने नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत म्हटले आहे की, गजानन काळे गेल्या काही वर्षांपासून आपल्याला मारहाण करत असून जातीवाचक शिवीगाळ सुद्धा करतो. इतकेच नाही तर त्याचे बाहेरील महिलांसोबत संबंध असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आमचे लग्न २००८ मध्ये झाले आणि लग्नानंतर १५ दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ घरगुती कारणांवरुन तसेच माझा सावळा रंग, जात यावरुन टोमणे मारत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून गजानन काळे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी विरुद्ध असणारे पुरावे उपलब्ध करुन घ्यावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने चौकशी करुन लवकरात लवकर आरोपपत्र न्यायालयात दाखल करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा : आता चर्चा शरिया कायद्याची…नेटकऱ्यांना का आठवले हमीद अन्सारी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.