गांधीजी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, असे मला वाटत नाही. कारण हा देश ४०-५० वर्षे जुना नसून ५ हजार वर्षे जुना आहे. या देशाच्या निर्मितीसाठी हजारो हात लागले आहेत. त्यामुळे एक कुठली व्यक्ती देशाची राष्ट्रपिता होऊच शकत नाही. मला मुळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मान्य नाही, असा घणाघात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही राष्ट्रपिता करण्याचा मुद्दा येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या निर्मितीमध्ये हजारो हात लागले, कुणा एकाचे नव्हे!
वीर सावरकर यांनी गांधींच्या सांगण्यावरून ब्रिटिशांना आवेदन पत्र लिहिले होते, असे मत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले. त्यानंतर काँग्रेसवाल्यांमध्ये पोटशूळ उठला. सावरकर द्वेष्ट्यांनी तर आकांड तांडव सुरु केला. या सर्व पार्श्वभूमीवर थेट वीर सावरकर यांचे वंशज रणजीत सावरकर यांनी सडेतोड मते मांडून सर्वांची तोंडे बंद केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ज्याप्रकारे काँग्रेसने सत्तेच्या हव्यासापोटी देशाला राष्ट्रनिष्ठ न बनवता व्यक्तीनिष्ठ बनवले. त्याकरता गांधींजींच्या नावाचे उद्दात्तीकरण केले आणि त्यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित केले. त्या संकल्पनेवरच रणजीत सावरकर यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला. भारतासारख्या देशाला एक राष्ट्रपिता असू शकत नाही. देशाच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे हजारो लोक असतील जे आता विस्मृतीत गेले असतील. या देशाला ५ हजार वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. त्यामुळे एक कुठली व्यक्ती देशाची राष्ट्रपिता होऊ शकत नाही, असे रणजीत सावरकर म्हणाले.
(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरः पहिले आणि सर्वात मोठे सैन्यकूटनीतीक व सामरिक तज्ज्ञ)
वीर सावरकरांच्या सुटकेसाठी गांधींनी लिहिलेले लेख!
वीर सावरकर आणि त्यांचे बंधू यांची कारागृहातून सुटका व्हावी, या भूमिकेचे गांधीजींनी समर्थन केले होते. त्यावेळी त्यांनी सावरकर बंधू हे राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी आहेत. त्यांचे देशकार्यासाठी योगदान आहे. त्यांची सुटका व्हावी, अशी इच्छा आहे, असे गांधींनी त्यांच्या २ लेखांमध्ये म्हटले होते. परंतु वीर सावरकर यांच्या सुटकेसाठी ७५ हजार लोकांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रावर मात्र स्वाक्षरी करण्यास गांधीजींनी नकार दिला होता, त्याचा स्पष्ट उल्लेख धनंजय किर यांच्या पुस्तकात आहे, असेही रणजीत सावरकर यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community