राज्यात सध्या कोरोनाचे संकट असताना, राज्य सरकार नेहमी नवनवीन नियमावली काढत आहे. राज्य सरकारच्या या नियमावलीची सगळेच जण वाट बघत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? आता आपल्या लाडक्या बाप्पाला देखील राज्य सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा आहे.
बाप्पाचे आगमन यंदा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. मात्र त्या आधी सहा महिने अगोदर बाप्पाची मूर्ती बनवण्याचे काम मूर्तिकार करत असतात. पण यंदा मात्र, हे काम अजूनही सुरू झालेले नाही. याला सर्वस्वी कारणीभूत ठरत आहे, ती म्हणजे राज्य सरकारची अजूनही न आलेली नियमावली. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे राज्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा तरी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत नेहमीप्रमाणे करता यावे, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. यंदाही कोरोनाची दुसरी लाट असल्याने मूर्तिकार बाप्पाच्या मूर्ती किती फुटाच्या बनवायच्या याच्या विचारात आहेत.
राज्य सरकार नियमावली कधी तयार करणार?
गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे अनेक मूर्तिकारांनी बाप्पाच्या मूर्ती या 3 फुटांपर्यत करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. मात्र यंदा तरी मूर्तीची उंची किती असावी हे सरकारने लवकर जाहीर करावे, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. जर मूर्तिकारांनी मोठ्या मूर्ती बनवल्या आणि सरकारने ऐनवेळी नियमावली काढली आणि मूर्त्यांची उंची कमी केली, तर त्याचा आर्थिक फटका मूर्तिकारांना बसू शकतो. त्याचमुळे सरकारने नियमावली लवकरात लवकर काढावी, अशी मागणी आता मूर्तिकार करू लागले आहेत.
(हेही वाचाः मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! लेव्हल ३ची बंधने लागू! )
मूर्ती पीओपीची की मातीची?
विशेष म्हणजे मूर्ती पीओपीची असावी की मातीची, याबाबत देखील सरकारकडून काही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐनवेळी जर सरकारने मातीच्या मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला, तर मातीच्या मूर्ती लवकर तयार होणे शक्य नाही. मातीची मूर्ती सुकवायला किमान एक ते दीड महिना लागतो, त्यानंतर रंग काम करता येते. मात्र सरकारने या बाबत देखील अजून ठोस निर्णय झालेला नसून, मूर्तिकार संभ्रमात आहेत.
सरकारी गोंधळ
मूर्तिकार हे आपले काम सहा महिने आधीपासूनच सुरू करत असतात. मात्र यंदा सर्वच प्रकारचा सरकारी गोंधळ असल्याने, अजूनही हे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे जर सरकारने नियमावली लवकरात लवकर काढावी, जेणेकरुन मूर्तिकारांना सर्व तयारी करायला वेळ मिळेल, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः अधिकृत अनलॉकची घोषणा! गोंधळ संपला!)
गेल्या वर्षापासून मूर्तिकार आर्थिक संकटात
वर्षातून एक दिवस मूर्तिकारांची कमाई असते. वर्षभर याच कमाईतून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र गेल्या वर्षी केवळ लहान मूर्ती बनवण्यात आल्या. यातून खर्चही निघाला नव्हता. मोठ्या मूर्त्यांमध्ये मूर्तिकाराला आपली कला देखील दाखवता येते, तसेच चांगली कमाई देखील होते. मात्र गेल्या वर्षी मोठ्या मूर्त्यांवर बंदी असल्याने तसेच मूर्तिकारांनी देखील स्वतः निर्णय घेतल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. यंदाही सरकारची अजून नियमावली न आल्याने मूर्तिकार चिंतेत आहेत.
यंदा तरी समजून घ्या..
प्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा खातू यांनी हिंदुस्थान पोस्टसोबत बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही नुकसान सहन करुन सरकारला सहकार्य केले. मात्र यंदा तरी सरकारने गेल्या वर्षी सारखा उशिरा निर्णय जाहीर न करता लवकर निर्णय जाहीर करावा. गेल्या वर्षी ऐनवेळी आलेल्या नियमांमुळे अनेकांनी मूर्तिकाम करणे सोडून दिले आहे. सरकारचा अहवाल आतापर्यंत यायला हवा होता, पण तो अजून आलेला नाही. आमच्यासाठी एक बजेट देण्याचे देखील प्रयोजन करण्यात यावे, तसेच उंची मध्ये देखील थोडी सूट द्यावी, अशी मागणी खातू यांनी सरकारकडे केली आहे.
सरकारने अनेकांना अनुदान जाहीर केले आहे. पण मूर्तिकारांचा यात समावेश केलेला नाही. आमची वर्षातून एकदा कमाई असते, याचा सरकारने विचार करायला हवा. तसेच सरकारने मूर्तीची उंची ठरवायला हवी, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार देखील केला आहे.
-प्रशांत देसाई, मूर्तिकार
Join Our WhatsApp Communityमातीच्या मूर्ती बनवायला किमान चार महिने तरी लागतात. पण सरकारने अजून काहीच नियमावली बनवलेली नाही. तसेच शाडूच्या मूर्ती करा असे म्हणत असाल, तर तेवढं साहित्य तरी पुरवा. आज आमच्याकडे कुणीच लक्ष देत नाही.
-गजानन तोंडवलकर, मूर्तिकार