पालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना केंद्राकडून गिफ्ट; १५ हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

134
एकीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाने कंबर कसली असताना, आता त्यांना केंद्राचीही भक्कम साथ मिळू लागली आहे. आगामी पालिका निवडणुकीआधी केंद्र सरकारने १५ हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देत मुंबईकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली.
अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात ‘मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पां’तर्गंत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, सुशोभीकरणाची कामे झाल्यानंतर मुंबई सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईचा विकासात्मक बदल करण्यासाठी मुंबईतील पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेणार आहोत. मुंबईतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने १५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केला आहे.
मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणे, स्थानिक तरुणांना रोजगार निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे. यावर्षी जी-20 परिषदेच्या आयोजनचा मान आपल्या देशाला मिळाला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने मुंबईस‍ह राज्यातील इतर शहरांमध्ये विविध बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी जगभरातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर राज्याची ब्रॅडींग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन आणि महिला बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार ॲड.आशीष शेलार, आमदार अमित साटम, आमदार डॉ. भारती लव्हेकर, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुंबईचा कायापालट या प्रकल्पाच्या डिजिटल कोनशिलाचे अनावरण करण्यात आले.

सामाजिक परिवर्तनाची सुरवात – फडणवीस

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली आहे. मुंबई महानगरपालिका त्यासाठी सक्षम आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर, सुसज्ज दिसण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यांतर्गत भिंती सुशोभित करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, वीस हजार शौचालये निर्माण करणे आणि ते चोवीस तास स्वच्छ ठेवणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
  • आंकाक्षित शौचालये तयार करण्यासाठी दुप्पट निधी देण्यात येणार आहे. झोपडपट्ट्यांमध्येही या कार्यक्रमांतर्गत आंकाक्षित शौचालये, कम्युनिटी वॉशिंग मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच हँगिंग लाईटच्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरवात मुंबईचा कायापालट या माध्यमातून करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.