आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याक समाजाच्या विकास योजनांना खीळ बसली आहे. अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित न झाल्यामुळे विद्यार्थी व महिला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. अल्पसंख्याक खात्याचा कारभार पाहणारे नवाब मलिक यांना या खात्याच्या कामकाजाकडे लक्ष देण्यास सवड नसल्याने या खात्यासाठी कर्तव्यदक्ष मंत्री नियुक्त करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कामकाजाकडे दुर्लक्ष
अध्यक्ष एजाज देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आघाडी सरकार सत्तेत येऊन दोन वर्षे होत आले तरी अल्पसंख्याक आयोगाचे गठन झालेले नाही. अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कामकाजही संचालकांच्या नियुक्त्या नसल्याने ठप्प झाले आहे. परिणामी या महामंडळाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ महिला, विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही. हज समिती स्थापन न केल्यामुळे हज यात्रेकरूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक हे या खात्याच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी या खात्याला न्याय देणारा कर्तव्यदक्ष मंत्री नियुक्त केला जावा.
(हेही वाचा : ड्रग्स प्रकरणात मलिकांनी आता केली ‘ही’ मागणी )
सक्रीय मंत्री द्या !
अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून प्रसार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कडे अल्पसंख्यांक समाजाच्या समस्यांचे निवारण करण्यास वेळ नाही. उठले सूठले पत्रकार परिषदा घेऊन लोकांच्या व्यक्तीगत जीवनात, परिवारावर बिनबुडाचे आरोप करुन त्रास देणे उचित नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पूर्ण वेळ देणारा असा, सक्रीय अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी द्यावा.
Join Our WhatsApp Community