अखिल हिंदूंसाठी आदर्श असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणे हा देशाचा सन्मान आहे. त्यासाठी कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या शिफारशीची गरज नाही, असे उत्तर गृहमंत्रालयाच्या वतीने लोकसभेत मंगळवारी, १ ऑगस्ट रोजी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले.
भारतीय जनता पक्षाचे नेते गोपाळ शेट्टी यांनी याविषयी प्रश्न विचारताना म्हटले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा भारत सरकारचा काही विचार आहे का? सर्वच हिंदू संघटना अनेक वर्षांपासून वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करीत आहे. त्यामुळे आज केंद्र सरकारच्या वतीने मांडण्यात आलेल्या भूमिकेमुळे सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, हे विशेष. यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले की, वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या सूचना वेगवेगळ्या ठिकाणांहून येत आहेत. यासाठी कोणत्याही औपचारिक सूचनेची आवश्यकता नाही. भारतरत्न कोणाला द्यायचा याचा निर्णय सरकार घेते.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नात म्हटले की, स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या दिशेने सरकारने काही पाऊल उचलले आहे का? या संदर्भात शासनाला कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून शिफारस प्राप्त झाली आहे का?, असे म्हटले. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी भाजप, शिवसेना या पक्षांव्यतिरिक्त हिंदुत्ववादी संघटनांनी अनेकदा केली आहे. दुसरीकडे, 2020 मध्ये, भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने संसदेत सांगितले की अंदमान आणि निकोबार प्रशासनाकडे असा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही, ज्यामुळे वीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती की नाही हे स्पष्ट होईल. शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांनी वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी विनंती केंद्र सरकारला फेब्रुवारी 2023 मध्ये केली होती. ते म्हणाले होते की, वीर सावरकर हे महाराष्ट्राचे महान व्यक्तिमत्व होते. ते महाराष्ट्राचे शूर सुपुत्र आहेत. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा.
Join Our WhatsApp Community