गोवा विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरु आहे. यामध्ये कोणाची युती आणि आघाडी झाली, याविषयी चर्चा-विनिमय सुरु आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात युती होणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात गोवा निवडणुकीत युती होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेण्याची मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे चित्र गोव्यात दिसणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत पटेल यांनी दिले आहेत. त्याबाबत दोन्ही पक्षाचे नेते एक बैठक घेऊन घोषणा करतील आणि कोण किती जागा लढणार हे जाहीर करणार असल्याचे समजते.
(हेही वाचा गड-किल्ल्यांच्या इस्लामीकरणाविरुद्ध भाजपने थोपटले दंड)
राष्ट्रवादीने काय केला दावा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणे प्रयोग करण्याचा विचार होता. मात्र काँग्रेसकडून त्याला नकार देण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना पटेल म्हणाले की, काँग्रेसचे म्हणणे आहे की, ते गोव्यात आपल्या बळावर निवडणूक जिंकू शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मदतीविना काँग्रेस गोव्यात एकही जागा जिंकू शकणार नाही, असा दावाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.
Join Our WhatsApp Community