राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाची सुरुवात वादळी झाल्याचे दिसून आले. विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर आले. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा मुद्दाही चांगलाच चर्चेत होता. चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर सरकारला फटकारले आणि याच मुद्द्यावर बोलताना गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना जर का मुख्यमंत्री पद दिलं, तर ते हे अधिवेशन संपण्याच्या आतच म्हणजे येत्या 4 दिवसांतच महाराष्ट्र विकून टाकतील, अशी खोचक टीका केली आहे.
भाजपा करतयं मागणी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी राहून विश्रांती घ्यावी. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही काळ आपल्या पदाचा चार्ज आदित्य ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर म्हणाले की, अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळे होतील, असं पडळकर म्हणाले.
कर नाही त्याला डर कशाला
याशिवाय सध्या सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्यांवरून देखील पडळकरांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील सर्व विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणहून लाखोंचे आकडे येत आहेत. हे प्रकरण आता थेट मंत्रालयापर्यंत पोहचलं. त्यामुळे हे सर्व काही सरकारच्या आशीर्वादाने चाललंय, असंही पडळकर म्हणाले. या घोटाळ्यात तुमचीच एवढी लोक सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार ? सीबीआयने चौकशी केली, तर बिघडलं कुठे? तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली, करू द्या ना सीबीआय चौकशी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
( हेही वाचा :तिस-या लाटेत कोरोनाचे दोन नवीन अवतार एकत्र! ओमायक्राॅन आणि…)