राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते आमने-सामने आले असून त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. एसटी कर्मचारी त्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय हा संप मागे घेणार नाही, यावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – ‘दाऊद नाव केवळ मुस्लिमांचच का?’ दरेकरांचा मलिकांना सवाल)
पवारांची एकमेव संघटनाच मान्यताप्राप्त
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवार यांनीच खऱ्या अर्थाने घात केला असल्याचे पडळकरांनी म्हटले आहे. यासह ते असेही म्हणाले की, पवारांची एकमेव संघटनाच मान्यताप्राप्त आहे. मात्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त संघटनेशीच चर्चा करतं. मात्र आजपर्यंत पवारांच्या संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत. त्यामुळे सरकार आणि मान्यताप्राप्त संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांचा घात केल्याचा घणाघात पडळकर यांनी केला. त्याचबरोबर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असा इशाराही पडळकर यांनी पुन्हा एकदा दिला.
मार्ग काढायचा की नाही हे सरकारच्या हातात
पडळकर पुढे असेही म्हणाले की, सरकार या एसटी संपावर मार्ग काढण्याऐवजी कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरवण्याचे काम करत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा देत आहे. त्यांना निलंबनाच्या नोटीसा देत आहे. आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. पण ते विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही बोलतच नाही तर मार्ग कसा निघणार, असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग कसा निघू शकतो याबाबत सरकारला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आता मार्ग काढायचा की नाही हे सरकारच्या हातात आहे, असं पडळकर म्हणाले.