पडळकर सहा वेळा का म्हणाले ‘किंबहुना’?

पडळकरांनी सहा वेळा किंबहुना शब्दाचा प्रयोग करत मुखमंत्र्यांच्या स्टाईलमध्ये वडेट्टीवारांवर निशाणा साधला.

190

किंबहुना… हा शब्द ऐकला तर तुम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बोलत असतील असे अनेकदा वाटते. भाषण असो वा पत्रकार परिषद, किंबहुना हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवर्जून उच्चारतात. मात्र आता याच किंबहुना शब्दाची भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी कॉपी केली आहे. एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल सहा वेळा त्यांनी किंबहुना हा शब्द वापरला आहे. भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारची ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती हरवल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या टीकेला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेलक्या शब्दांत उत्तर दिले होते. ‘गोपीचंद पडळकर हे अज्ञानी बालक आहे, आता आता उगवलेले गवत आहे,’ असा टोला त्यांनी लगावला होता. या टीकेवर गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहीत उत्तर दिले. या पत्रात पडळकरांनी सहा वेळा किंबहुना शब्दाचा प्रयोग करत मुखमंत्र्यांच्या स्टाईलमध्ये वडेट्टीवारांवर निशाणा साधला.

(हेही वाचाः ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती हरवली! गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!)

असे आहे पडळकरांचे पत्र

  • मी मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर ‘निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे.
  • किंबहुना,आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसींच्या हितासाठी स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्यासाठी धारण करता आले नसते.
  • किंबहुना मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते.
  • किंबहुना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंडरस्टॅंडिंग न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता.
  • किंबहुना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारुची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधील दारुबंदी उठवता आली नसती.
  • किंबहुना दारु बंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरित करता आले नसते.
  • किंबहुना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती.
  • किंबहुना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेन.ॉ

मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

(हेही वाचाः गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यानंतर एमपीएससी आयोगाला आली जाग!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.