महाडमध्ये गोरक्षकांना मारहाण; पोलिसांची निष्क्रियता; आमदार Nitesh Rane यांनी थेट दिला इशारा; म्हणाले…

पोलि‍सांवर हल्ले करण्याची या समाजकंटकांची हिंमत होते कशी? गाईचे रक्षण करणाऱ्यांवर होणारे हल्ले यापुढे सहन करणार नाही, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

227
दोन दिवसांपूर्वी बकरी ईदच्या दिवशी महाड येथे गोवंश हत्या रोखणाऱ्या गोरक्षकांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर गोवंश हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट महाड पोलीस ठाणे गाठले, त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरत यापुढे गोरक्षकांवर मारहाण झाली तर हिंदू पोलिसांकडे येणार नाही, तर थेट त्यांच्या घरात घुसून त्यांचे हात-पाय तोडतील, असा इशारा दिला.
दोन दिवसापूर्वी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला. बुधवारी, १९ जूनला रात्री उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाड उपविभागीय पोलीस अधीक्षक शंकर काळे यांची भेट घेऊन, आमदार नितेश राणे यांनी गोरक्षकांविरोधात झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांना धारेवर धरले. पोलिसांनी संबंधित विरोधात कारवाई न केल्यास,आम्हीच कायदा हातात घेऊन त्यांना धडा शिकवू, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

समाजकंटकांकडून पोलिसांनाही मारहाण

पोलि‍सांवर हल्ले करण्याची या समाजकंटकांची हिंमत होते कशी? गाईचे रक्षण करणाऱ्यांवर होणारे हल्ले यापुढे सहन करणार नाही. राज्यात कायद्याचे राज्य असताना अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटना या दुर्दैवी व संतापजनक आहेत. गाईचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर झालेला हल्ला यापुढे आम्ही सहन करणार नाही. संबंधितांना जशास तसे उत्तरे देऊ, अशा स्पष्ट शब्दात आमदार नितेश राणे यांनी डीवायएसपी शंकर काळे यांना धारेवर धरले. समाजकंटकांनी पोलिसांनाही मारहाण केली, त्यावरूनही नितेश राणे यांनी पोलिसांना थेट सवाल केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पोलीस प्रशासन हिंदूंना मारहाण करणाऱ्यांना जर सोडून देत असेल तर नाहक सरकारची बदनामी होत नाही का, असे राणे (Nitesh Rane) म्हणाले. कायदा सर्वांना समान आहे तर मग या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण काय, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली. तसेच आगामी काही दिवसांमध्ये सर्व संबंधितांना अटक करण्याची मागणी राणे यांनी पोलिसांना केली. याप्रसंगी महाड पोलादपूरमधील गोरक्षकांसह शेकडो हिंदुत्ववादी युवक तेथे उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.