आदित्य ठाकरेंना सरकारचा मोठा धक्का: वांद्रे-माहिम किल्ल्यापर्यंतचा सायकल ट्रॅक प्रकल्प केला रद्द

202

वांद्रे किल्ला ते माहिम किल्ल्यापर्यंत महापालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या बोर्डवॉक तसेच सायकल ट्रॅक बांधण्याचे कंत्राट कामच राज्य सरकारने रद्द केले आहे. सरकारने रद्द केलल्या या कंत्राट कामांची माहितीच आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेऊन यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूक केली होती. त्यामुळे एकप्रकारे हे कंत्राट काम रद्द करून एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना मोठा दणका दिल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : …पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया )

तत्कालिन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिम किल्ला ते वांद्रे किल्ला हा मार्ग सायकल ट्रॅकने जोडण्याची संकल्पना मांडत हा प्रकल्प राबवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. हा बोर्ड वॉक प्रकल्प राबवताना पर्यावरणपूरक साहित्याचा उपयोग करुन सायकल मार्गिका, पादचारी मार्गिका बांधली जाणार आहे. ३ किलोमीटर लांबीच्या आणि ५ मीटर रुंदीच्या या सायकल ट्रॅक व बोर्ड वॉक प्रकल्पात कोणताही अडथळा न ठरता याच्या बांधकामाचे नियोजन करून मागवण्यात आलेल्या या निविदेची प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही निविदा ५ जानेावरी २०२२ रोजी उघडण्यात आली होती.

पुढील वर्ष भरात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा कामासाठी युनिक कंस्ट्रक्शन- स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली होती. या कामासाठी सुमारे २१८ कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली असून या सायकल ट्रॅकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित संस्थेची असेल,असे या निविदा अटींमध्ये स्पष्ट केले होते.

दरम्यान या प्रकल्पाला भाजपचा विरोध असतानाही या कामाचा कार्यादेश देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात आल्यानंतर हा मुद्दा सरकारी दरबारी मांडला गेला. भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड आशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल घेत राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने हे प्रकल्प कामच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ऍड आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातूनही ही माहिती दिली असून प्रसार माध्यमांशी बोलतांना, त्यांनी मागील पाच वर्षांमध्ये कंत्राटदार आणि ठेकेदाराला पुरक अशाच निविदा निघत होत्या,या मधल्या परंपरेतील माहिम़़-वांद्रे सायकल ट्रॅकची ही २०८ कोटी रुपयांची निविदा नॅशनल हायवे अॅथॉरिटीलासुध्दा रस्ते बनवायला लागणाऱ्या किंमतीपेक्षा दुप्पट किंमत सायकल ट्रॅक बनवायला येणार आहे. मुंबईकरांच्या पैशांची लुट करायची आणि ते सुध्दा काम कोणाला द्यायचे तर ज्याला काळ्या यादीत टाकले आहे त्याला असा सवाल केला आहे. ज्या कंपनीला काम दिले त्यांना २०१६ ते २०१९मध्ये जनतेच्या पैशांवर मुजोरी केली म्हणून काळ्या यादीत टाकले होते. त्यांना, वर्क ऑर्डर जर महापालिका आता देणार असेल वांद्र्यातील व मुंबईकर जनतेचा विरोध आहे. मी स्वत: याबाबत पत्र लिहिले, तरीही याचा कार्यादेश देण्याचा प्रयत्न महापालिकेतील शुक्राचार्यांनी केला, त्यांना आता चपराक बसली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेलार यांनी धन्यवाद मानले असून भ्रष्टाचारी कंत्राटदाराला आता मुंबईत थारा नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.