सरकारचे धूळफेक करणारे पॅकेज! देवेंद्र फडणवीस यांची टीका    

मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे, हे या सरकारला माहितीच नाही. त्यामुळे नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

123

१४ एप्रिल रोजी, रात्री ८ वाजल्यापासून सरकारने अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याआधी विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे. पण सरकारने जाहीर केलेले 5 हजार 300 कोटींचे पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. याचे कारण 3 हजार 300 कोटींची तरतूद कोरोनासंदर्भात सांगण्यात आली आहे, ती रेग्युलर बजेटमधील तरतूद आहे, जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे आताच्या वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाकरिता हे 3 हजार 300 कोटी रुपये दिलेले नाहीत. सरकार किती बेड्स, व्हेंटिलेटर वाढवणार, त्याचा कालावधी काय? यासंदर्भातील माहिती सरकारकडून अपेक्षित होती. सरकारने अनेक घटकांना कोणतीही मदत केलेली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालय, छोटे उद्योग वाले नाहीत, कोणालाही कोणतीही मदत केलेली नाही. खरे तर यामध्ये दिशाभूल करण्यात आली आहे की, वृद्धापकाळ, श्रावणबाळ या केंद्र सरकारच्या योजना आहेत. यामध्ये सरकार अतिरिक्त 1000 रुपये देईल असे वाटले होते. पण एकही नवीन पैसा मिळत नसून जो मिळणारच आहे तो थोडा आगाऊ राज्य सरकारच्या वतीने देण्यात येत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फेरीवाल्यांची फसवणूक!

समाजातील गरीब घटकांसाठी मदत जाहीर करताना फेरीवाल्यांना मदत करु असे सांगितले आहे. फेरीवाल्यांना मदत करण्याचा निर्णय मागच्या काळात केंद्र सरकारकडून घेण्यात आला, ती मदत पोहचली. राज्य सरकारने आता दीड हजार रुपयांची मदत देण्याचे ठरवले आहे. पण त्याकरता नोंदणीकृत असा उल्लेख केल्याने याचा उपयोग फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता होणार आहे. याशिवाय रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना पार्सल देण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण संचारबंदी लावल्याने त्यांच्याकडे येणार कोण? पार्सल देण्याची त्यांच्याकडे काय व्यवस्था आहे. व्यवस्था असती तर त्यांनी दुकानच उघडले असती, असा सवाल फडणवीस यांनी केला.

(हेही वाचा : परबांमुळे जुने-जाणते शिवसैनिक ‘मातोश्री’ला झाले ‘पोरके’?)

मुंबई, पुण्याच्या पलीकडे महाराष्ट्र दिसत नाही!

ऑक्सिजनचे व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी होत असून त्याकडे लक्ष दिले पाहिजे, मुंबई आणि पुणे ही आपली महत्वाची शहरे आहेत. त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे, हे या सरकारला माहितीच नाही. त्यामुळे नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. गेल्यावेळीही नागपूरला कोणती व्यवस्था केली नाही, आजही नागपूरची स्थिती वाईट आहे. त्यामुळे मी आलो आहे. जितकी शक्य तितकी मदत करणार आहे. पण सरकार कोणतीही मदत किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.