कोरोना काळात आशा वर्कर्सने जीव धोक्यात घालून गावखेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा पुरवली, त्या आशा वर्कर्सने किमान वेतन देण्याची मागणी करत १५ जूनपासून राज्यव्यापी संप सुरु केला आहे. या मागण्यांसाठी १६ जून रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक झाली असता सरकारकडे पैसे नाहीत, असे सांगत टोपे यांनी त्यांची बोळवण केली. त्याबद्दल आशा वर्कर्सने तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा संप सुरु ठेवण्याचा निर्णय आशा वर्कर्सने घेतला आहे.
या मागण्यासाठी आशा वर्कर्सचा बेमुदत संप!
महाराष्ट्र राज्यात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचा 15 जूनपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कृती समितीच्या नेत्यांना मंत्रालयात त्यांच्या दालनात चर्चेसाठी आमंत्रित केले होते. आशा व गटप्रवर्तक कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत आहेत. त्या दररोज सात-आठ तास काम करतात. त्यांना अत्यंत कमी वेतनावर राबवून घेतले जाते. त्यांना जगण्यासाठी किमान वेतन द्यावे, कोरोना संबंधित कामाच्या मोबदल्यामध्ये वाढ द्यावी. कोरोना संबंधित काम करण्यासाठी तीनशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भत्ता सर्व राज्यभर आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना द्यावा. आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गटप्रवर्तक यांचे सुसूत्रीकरण करावे, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
(हेही वाचा : आता भुजबळ भाजपच्या रडारवर! ओबीसी आरक्षणावरून काय म्हणाले दरेकर? )
सरकारकडे पैसे नसल्याने मागण्या पूर्ण होऊ शकत नाही! – आरोग्यमंत्री
राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असून आता कोणताही आर्थिक बोजा सहन करण्याची सरकारची परिस्थिती नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे शक्य नाही व कोरोना संबंधित मोबदल्यात वाढ करणे शक्य नाही, असे राजेश टोपे यांनी चर्चेदरम्यान सांगितले. संप मिटवण्याकरता कोणताही प्रस्ताव त्यांनी कृती समितीच्या नेत्यांसमोर मांडला नाही, त्यामुळे वरील मागण्यांसाठी बेमुदत संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. आजच्या बैठकीत राजेश टोपे, आरोग्य सचिव व्यास, आयुक्त रामस्वामी, आशा कर्मचारी व गटप्रवर्तक कृती समितीचे नेते एम.ए. पाटील, डॉ. डी.एल. कराड, राजू देसले, श्रीमंत घोडके, आरमायटी इराणी, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे इत्यादी नेते उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community