ओबीसी, मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळाले आहे. सारथी आणि महाज्योती या संस्थांना आम्ही बळकट करीत आहोत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘अमृत’या संस्थेला देखील उभारी दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे घटक हे आमचे पहिले प्राधान्य आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. आम्ही तातडीने प्रत्यक्ष अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी दिल्या. प्रशासनाला निर्देश दिले, त्याप्रमाणे वेगाने पंचनामे सुरू झाले. २८ जिल्ह्यांना फटका बसला असून १५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असावे, असा अंदाज आहे. सुमारे १५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले, त्यांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली. अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सध्या ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येते, ती वाढवून ३ हेक्टर मर्यादेत करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
(हेही वाचा- भारतमातेच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण)
सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी केंद्राशी आम्ही बोलतो आहोत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रातील इतर मंत्र्यांनी राज्याच्या विकासाला काही कमी पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. केंद्राच्या योजनांची आणि कार्यक्रमांची राज्यात सर्वात चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे, असे निर्देश आम्ही प्रशासनाला दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘आमचे गुरुजी’ उपक्रम
राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगली अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यात वर्गामध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यातील कोणतीच शाळा एक शिक्षक राहणार नाही, असे नियोजन आम्ही केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ग्रीन फिल्ड शहरांच्या निर्मितीवर भर
- राज्यातील शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पीएम गती शक्ति मॉडेलचाही उपयोग आम्ही करणार आहोत. राज्यात ग्रीन फिल्ड शहरे निर्माण करण्यावर भर देत आहोत. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विकासाचा महामार्ग ठरेल यात काही शंकाच नाही. येत्या काही दिवसांत या महामार्गाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल.
- पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशनसारख्या योजनेची ७५ टक्के अंमलबजावणी झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून आम्ही बेघरांना निवारा दिला आहे. पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.