अनिल परबांच्या अडचणी वाढणार? सोमय्यांनी दिली मोठी माहिती

ठाकरे सरकारच्या सर्वच घोटाळेबाज मंत्र्यांविरोधात कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

94

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट्स पाडण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. या अनधिकृत मालमत्तेवरुन आजवर अनेकदा सोमय्या यांनी परबांवर गंभीर आरोप केले होते. पण अनिल परब यांनी मात्र ते रिसॉर्ट आपले नसून, आपला त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

काय आहेत केंद्राचे आदेश?

दापोलीच्या समुद्र किना-यावरील अनिल परब यांचे सी रिसॉर्ट एन एक्स आणि सी क्रौंच हे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत असून ते सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ते ताबडतोब पाडण्याचे आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पर्यावरण कायद्याचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटी ला देण्यात आले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तोडून तेथे पुर्वीसारखा किनारा करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारची असणार आहे.

घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई होणार- सोमय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधले. बंगल्यानंतर आता परबांचे रिसॉर्टही तोडले जाणार असे म्हणत सोमय्या यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ठाकरे सरकारच्या सर्वच घोटाळेबाज मंत्र्यांविरोधात कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

माझा त्या रिसॉर्टशी संबंध नाही- परब

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मात्र आपला त्या रिसॉर्टशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. यावरुन सोमय्या यांनी माझ्यावर वारंवार आरोप केले आहेत. त्याविरोधात मी न्यायालयात तक्रार सुद्धा केली आहे. त्यामुळे सोमय्या यांनी माझी माफी मागावी असेही परब यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.