राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांना नारळ देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता राज्यपालांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे स्पष्टीकरण राज्यपालांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.
( हेही वाचा : “मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी”, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही- एकनाथ शिंदे)
कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 30, 2022
काय म्हणाले राज्यपाल?
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे. असे ट्वीट राज्यपालांनी केले आहे.
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community