आपण मुख्यमंत्री नाही, हे राज्यपालांना कळायला हवं! नवाब मलिकांची टीका

राज्य सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करुन, राज्यात दोन सत्ता केंद्रं स्थापन करण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत आहेत.

राज्यात राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेले राज्यपाल आणि वास्तव कार्यकारी प्रमुख असलेले मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ, यांच्यातले वाद अनेकदा सर्वांसमोर आले आहेत. राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून अनेकदा राज्यपालांवर टीका करण्यात आली आहे. तशीच एक टीका आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच आपण आता मुख्यमंत्री नाही, तर राज्यपाल आहोत हे राज्यपालांना कळले पाहिजे, असे मोठे विधानही नवाब मलिक यांनी केले आहे.

(हेही वाचाः पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने केली पॅकेजची घोषणा! किती मिळणार मदत?)

राज्यपालांच्या दौ-यावर आक्षेप

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्याचे राज्यपाल वारंवार राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल 5,6,7 ऑगस्ट रोजी काही विद्यापीठांचा दौरा करणार आहेत. यामध्ये अल्पसंख्यांक मंत्रालयातर्फे विद्यापीठात वसतीगृहे बांधण्यात आली आहेत. ही वसतीगृहे अजून विद्यापीठांकडे राज्य सरकारने वर्ग केलेली नाहीत. त्याचे उद्घाटन करण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे. असे असताना सरकारला न विचारता या वसतीगृहांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम राज्यपालांनी जाहीर केला आहे. तसेच या दौ-यात राज्यपाल जिल्हाधिकारी आणि आयुक्तांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे अशाप्रकारे राज्य सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करुन, राज्यात दोन सत्ता केंद्रं स्थापन करण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.

(हेही वाचाः तुम्हीच लिहा स्वातंत्र्यदिनाचे माझे भाषण! मोदींचे जनतेला ‘हे’ आहे आवाहन!)

मंत्रीमंडळाने केला विरोध

राज्यपालांना राज्यातील कुठल्याही विषयाबाबत माहिती हवी असल्यास, त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना रितसर पत्र लिहून ती मागवणं अपेक्षित आहे. पण तसे न करता ते थेट राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर करत आहेत. हा विषय कॅबिनेटमध्ये चर्चेला आल्यानंतर त्यात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मंत्रीमंडळाने राज्यपालांच्या या दौ-याचा विरोधही केला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांना भेटून याबाबत अवगत करतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

आपण राज्यपाल असल्याचा पडला विसर

राज्यपाल कोश्यारी याआधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे जर त्यांना वाटत असेल की आताही आपण मुख्यमंत्री आहोत, तर तसे नाही हे त्यांना कळले पाहिजे, आपण राज्यपाल असल्याचा त्यांना विसर पडला आहे का, अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हरकत घेतल्यानंतर राज्यपाल आपला हा दौरा केवळ विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून विद्यापीठांपुरता मर्यादित ठेवतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

(हेही वाचाः आता ‘नाना’ देणार चव्हाण-थोरात समर्थकांना नारळ?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here