राज्यातील राज्यपाल हे जरी देशाच्या राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येत असले तरी त्यांची निवड ही केंद्र सरकारकडूनच करण्यात येते. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यातील राज्यपाल यांच्यात सलोख्याचे संबंध असतात. पण मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सातत्याने मोदी सरकारच्या विरोधी भूमिका घेत असल्याचे पहायला मिळाले आहे. केंद्र सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला देखील मलिक यांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर सध्या केंद्र सरकार नाराज असल्याचे बोलले जात असतानाच आता सत्यपाल मलिक यांनी एक विधान केले आहे.
माझा राजीनामा माझ्या खिशात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकेताची मी वाट पाहत असल्याचा इशारा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.
मी स्वतः पदावरुन बाजूला होईन
शेतकरी आंदोलनाच्या बाबतही मलिक यांनी केंद्र सरकारविरोधी भूमिका घेतली होती. त्यानंतर आता अग्निवीर योजनेबाबतही त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. तेव्हा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी विधान केले आहे. मी कायम जनतेच्या बाजूने बोलत आलो आहे आणि यापुढेही बोलत राहीन. मी पहिल्यांदा जेव्हा केंद्र सरकारच्या विरोधात बोललो होतो तेव्हापासूनच माझ्या खिशात माझ्या राज्यपाल पदाचा राजीनामा तयार आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तसे संकेत मिळतील त्या दिवशी मी स्वतः माझ्या पदाचा राजीनामा देईन, असा इशारा सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.
Join Our WhatsApp Community