राज्यपालांकडून घटनेचा भंग! संजय राऊतांच्या आरोप 

राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषद सदस्य यादीवरून मुंबई उच्च न्यायालयाने काल प्रश्न विचारला, आम्ही तर वर्षभरापासून विचारत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार आहेत, हा आमचा अपमान आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. 

विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी देऊन वर्ष उलटले, तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्याकडे पाहत नाही, हा राज्यपालांकडून घटनेचा भंग आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

हा तर आमचा अपमान! 

मंत्रिमंडळाने शिफारस केलेली त्या १२ विधान परिषद सदस्यांच्या यादीत कुणी साहित्यिक आहे, कुणी कलाकार तर कुणी सामाजिक कार्यकर्ते आहे. त्यांनी आमदार म्हणून शपथ घेणे आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निघून जाणे हा त्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे. मात्र आज त्याला वर्ष उलटले तरी राज्यपालांनी त्या यादीवर स्वाक्षरी केली नाही. जर आज ते आमदार असते, तर कोरोना आणि वादळासारख्या संकटात काम करताना दिसले असते, असेही राऊत म्हणाले. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल प्रश्न विचारला आहे, आम्ही तर वर्षभरापासून विचारत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार आहेत, हा आमचा अपमान आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा : ‘त्या’ नक्षलवाद्यांवर जाहीर झालेली ६० लाखांची बक्षिसे!)

ओएनजीसीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा! 

इतके मोठे चक्री वादळ येणार आहे, हे केंद्रीय गृहमंत्रालयाने कळवले नव्हते का? ज्या ओएनजीसीच्या बार्जवरील कामगारांचा मृत्यू झाला, ती माणसे नव्हती का? या प्रकरणी ओएनजीसीच्या कॅप्टनवर गुन्हा दाखल झाला आहे, तो सध्या फरार आहे. मात्र त्यापेक्षा ओएनजीसीचे सीएमडी, संचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here