महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आता मराठवाड्यातून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची घटना समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. परळीतील ‘वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर’ गुरुवारी, १३ एप्रिल २०२३ सकाळी १० वाजता जीएसटी विभागाने छापा टाकला, तेव्हापासून कारखान्यासंबंधित आर्थिक व्यवहारांच्या चौकशी सुरू झाली आहे. केंद्र सरकारचा जीएसटी न भरल्यामुळे किंवा थकवल्यामुळे ही कारवाई होत असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता या घटनेमुळे पुन्हा एकदा भाजप आणि पंकजा मुंडे यांच्यातील नाराजी नाट्यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक नेत्यांच्या घरी किंवा कारखान्यांवर केंद्र सरकारकडून कारवाई येत आहे. त्यावरून भाजपविरोधी नेत्यांवरच कारवाई होत असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून केले जात आहेत. मात्र आता पंकजा मुंडे या स्वतः भाजप नेत्या असूनही त्यांच्यावर झालेली ही कारवाई पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण रोज नवनवे वळण घेतांना दिसत आहे. अशातच आता पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावरील कारवाईमुळे राज्यातील राजकारण नेमके कोणते वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.
(हेही वाचा – “बंड करून ९ महिने झाले आता आम्हाला विसरा… नव्याने पक्षबांधणी करा”, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंवर निशाणा)
Join Our WhatsApp Community