मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे अवतरणार शिवसेनाप्रमुखांच्या रुपात

101

हिंदू नववर्षांच्या अर्थात गुढीपाडव्या दिवशी मनसेचाही परंपरागत मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (शिवतिर्थ) होणार आहे. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलणार आणि कुणाचा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी चाळीस वर्षे शिवतिर्थांचे मैदान गाजवले. एकच नेता, एकच मैदान चाळीस वर्षे विराट सभांनी गाजवलेल्या बाळासाहेबांची उणीव सध्या चाहत्यांना जाणवू लागली असून ही जागा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेऊ लागले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या या मनसेच्या मेळाव्याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष असून या सभेमध्ये राज ठाकरे हे बाळासाहेबांप्रमाणे अंगावर शाल पांघरुनच मनसैनिकांसह चाहत्यांना संबोधित करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

( हेही वाचा : ‘गृह’कलहात मुख्यमंत्र्यांची उडी! )

गुढीपाडवा मेळावा

मागील दोन वर्षांमध्ये मनसेचा गुढीपाडव्याला शिवतिर्थावर मेळावा होऊ शकला नाही. त्यामुळे दोन वर्षाचा खंड पडल्यानंतर यंदा मनसे जोमाने मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. आजवरच्या सर्व मेळाव्यांच्या तुलनेत यंदाच्या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून मनसेच्या प्रत्येक शाखाशाखांमधून या मेळाव्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये विराट गर्दी होण्याची शक्यता असून बाळासाहेबांच्या आजवरच्या सभेपेक्षाही गुढीपाडव्याच्या सभेला मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मेळावा सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

एक वक्ता, लक्ष लक्ष श्रोते!

या मेळाव्याची जाहिरातबाजी करताना मनसेने एक वक्ता, लक्ष लक्ष श्रोते! असे म्हणत वाजत-गाजत गुलाल उधळत चला शिवतीर्थावर असे आवाहन मनसैनिकांना केले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्येही शिवसैनिकांना वाजत गाजत गुलाल उधळत असे आवाहन केले जायचे. एकच नेता आणि एकच मैदान चाळीस वर्षे विराट जनसागरांच्या साक्ष्रीने गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकार तसेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा कसा समाचार घेता आणि मनसैनिकांना काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. या मेळाव्या तयारीसाठी शाखाशाखांमधून मनसैनिक जय्यत कामाला लागले आहेत.

या मेळाव्यामध्ये राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या वेशभुषेत दिसणार असून बाळासाहेबांप्रमाणे प्रथमच राज ठाकरे हे अंगावर भगवी अथवा पांढरी शाल पांघरुनच भाषण करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यात कोणत्या लूकमध्ये दिसतात याचीही उत्सुकता मनसैनिकांसह जनतेला लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.