Gujarat Assembly Election: काँग्रेसमध्ये प्रवेश करत बड्या नेत्याचा भाजपला धक्का, निवडणुकीच्या तोंडावर बंडाळी वाढली

130

गुजरात विधानसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सत्तास्थापनेसाठी सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर तयारीला सुरुवात झाली आहे. 25 वर्षांपेक्षा जास्त काळ गुजरातमध्ये असलेली आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तर विरोधी पक्ष काँग्रेस आणि आपकडून भाजपला शह देण्याचा प्रयत्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपला मोठा धक्का बसून निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या एक बड्या नेत्याने आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गुजरातमधील भाजपचे मोठे नेता आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जय नारायण व्यास यांनी भाजपला जय श्रीकृष्ण म्हणत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र समीर व्यास यांनी देखील काँग्रेसचा हात धरला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत या दोघांचाही पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फतवा, डॉक्टर आणि वैद्यकीय अधिका-यांना बसणार चाप)

गुजरातमध्ये काटे की टक्कर

दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी मतदान पार पडणार असून, 8 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. 10 डिसेंबर पर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे कळणार आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवे आव्हान दिले होते. यावेळी आप आणि काँग्रेसने देखील भाजपला सत्तेवरुन हटवण्यासाठी कंबर कसली असून,आता त्यांचे प्रयत्न किती यशस्वी होणार हे लवकरच कळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.