गुजरातमध्ये पुन्हा काँग्रेस नैतिक विजय होणार का?

१ डिसेंबरला ८९ जागांसाठी आणि ५ डिसेंबरला ९३ जागांसाठी गुजरातमध्ये निवडणूक होणार आहे. दिनांक ८ रोजी मतदानाचे निकाल येतील. एकूण १८२ जागांसाठी मतदान होणार असून ९२ जागा जिंकणारा पक्ष सत्ता स्थापन करु शकतो. २०१७ मध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये कांटे की टक्कर झाली होती. भाजपला ९९ तर कॉंग्रेसला ८० जागा जिंकता आल्या. यावरुन राहुल गांधींची खूप चर्चा झाली होती.

राहुल गांधी यांनी मोदींशी चांगली लढत दिली म्हणून हा राहुल गांधींचा आणि कॉंग्रेसचा नैतिक विजय असल्याचा साक्षात्कार कॉंग्रेसला आणि चाय बिस्कुट पत्रकारांना झाला होता. कॉंग्रेस आणि राहुल गांधीचा पराभव होऊनही त्यांच्या दृष्टीने झालेल्या नैतिक विजयात इतके अडकून पडले की त्यानंतर अनेक राज्यांतून कॉंग्रेस हद्दपार झाली आणि २०१९ ची लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी चांगलाच मार खाल्ला.

आपल्या देशात कुटुंबनियोजन पक्षांची समस्या अशी आहे की, कुटुंबाचे युवराज हे पराभूत झाले तरी त्यांना युवराज पदावरुन हटवले जात नाही. त्यामुळे पक्ष जिंकण्याला प्राधान्य न देता युवराजांचं राजकीय करिअर महत्वाचं ठरतं. कारण एकाच कुटुंबाला आपला पक्ष अर्पण केला असल्यामुळे पक्षाची वाताहत झाली तरी युवराजांना अभय मिळायला हव असं विचित्र धोरण तयार होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे लगेच मंत्री झाले. मंत्री बनवण्याची इतकी घाई का? राजकीय करिअर व्यवस्थित सुरु देखील झालं नव्हतं. या अट्टाहासापोटी त्यांचा पक्ष फुटला.

कॉंग्रेसचीही तीच अवस्था आहे. अनेक मातब्बर लोक कॉंग्रेसला सोडून गेले आणि अनेक पराभूत झाले. मी तर असं म्हणेन की देशात मोदी लाट नसून राहुल गांधींची लाट आहे आणि ती पराभवाची लाट आहे. राहुल गांधींचा पराभव मोदींनी केला नसून राहुल यांनी स्वतःच हरवलं आहे. इतकी क्षमता त्यांच्यामध्ये निश्चितच आहे. आता आम आदमी पक्ष देखील गुजरातच्या रिंगणात उतरला आहे. परंतु आपला खूप मोठा चमत्कार करता येणार नाही. आप कॉंग्रेसचं नुकसान करु शकेल. कॉंग्रेसकडच्या काही जागा आपकडे येऊ शकतात आणि भाजपा मात्र यावेळी सेंच्युरी मारण्याची शक्यता आहे.

कारण कॉंग्रेसला जिंकण्यात रस तर राहुल गांधी यांना युवराज राहू देण्यात रस आहे. त्यामुळे यंदा कॉंग्रेसचा नैतिक विजय देखील होणार नाही. हो! लाजिरवाण्या पराभवाला कॉंग्रेस नैतिक पराभव म्हणू शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here