‘नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी’

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते घरी एक बोलतात आणि बाहेर वेगळे बोलतात अशी टिका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे.  नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे अशी टीका नारायण राणेंनी केली होती. यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिले असून, बोलल्याशिवाय राणेंकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून ते तोच प्रयत्न करतात असे देखील राणे यावेळी म्हणालेत.

राणेंनी कोकणासाठी काय केलं

नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं. शिवसेनेत असताना ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

नारायण राणे काय म्हणाले होते?

नाणार प्रकल्पाला काही स्थानिकांनी दोन दिवसांपूर्वी समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे.” असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करताना केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here