गुलाबराव की खडसे, भाजपचे नगरसेवक नेमके कोणी फोडले?

भाजपचे हे नगरसेवक नेमके फोडले तरी कुणी, असा प्रश्न आता जळगावच्या राजकारणात रंगू लागला आहे.

राज्यात एकीकडे सचिन वाझे यांच्यामुळे ठाकरे सरकार अडचणीमध्ये असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना धक्का मिळाला. ज्या जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता होती, त्याला सुरुंग लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. भाजपचे २७ नगरसेवक शिवसेना नेत्यांसोबत सहलीला गेले आहेत. मात्र भाजपचे हे नगरसेवक नेमके फोडले तरी कुणी, असा प्रश्न आता जळगावच्या राजकारणात रंगू लागला आहे.

खडसे म्हणतात सर्व नगरसेवक मला भेटले

सहलीला गेलेल्या सर्व नगरसेवकांनी नाथा भाऊंची भेट घेतल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले आहे. तर दुसरीकडे या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पुढील नियोजन ठरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतरच हे सर्व नगरसेवक सहलीला गेले. जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक १८ मार्चला होणार आहे.

(हेही वाचाः शिवसेनेची ‘ती’ प्रकरणे आता नितेश राणे बाहेर काढणार?)

महाजनांनी उपमहापौर केले तेही फुटले

सगळ्यात महत्वाचे म्हणजे खडसे समर्थक असलेल्या सुनील खडके यांना गिरीश महाजन यांनी उपमहापौर केले होते मात्र, ते देखील शिवसेनेला जाऊन मिळाले आहेत.

असे आहे संख्याबळ-

एकूण नगसेवक- ७५

बहुमताचा आकडा- ३८

भाजपचे नगरसेवक- ५७

शिवसेनेचे  नगरसेवक- १३

इतर-

भाजपमधील २७ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. दरम्यान शिवसेनेचा हा राजकीय डाव यशस्वी झाल्यास, शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री महाजन यांची वर्णी महापौरपदी लागू शकते.

(हेही वाचाः मुंबईचे नाशिक करायचे आहे का? भाई जगताप यांना आयुक्तांनी सुनावले )

जळगावात पण टप्प्यात कार्यक्रम?

गेल्या महिन्यात झालेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकवत, राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौरपदी निवडून आणले होते. त्यावेळी जयंत दादांनी आपला फॉर्म्युला वापरला होता. टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करतोच असे म्हणत जयंत दादांनी भाजपची सहा मते फोडली होती. भाजपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आता तोच पॅटर्न नाथाभाऊ जळगावात वापरुन टप्प्यात कार्यक्रम करणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here