ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेआधीच खासदार संजय राऊतांनी राजकीय वातावरण तापवले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांवर कोरोना काळात ४०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपावर आता गुलाब पाटलांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर देऊन राऊतांना आव्हान केले आहे. जर एक रुपायाचा भ्रष्टाचार जरी निघाला असेल आणि या आरोपात तथ्य असेल, तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही. नाहीतर राऊत खासदारकीचा राजीनामा देतील का? असा सवाल करत गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) खुले आव्हान दिले आहे.
नक्की काय म्हणाले गुलाबराव पाटील? (Gulabrao Patil)
संजय राऊतांच्या ४०० कोटींच्या आरोपावर बोलताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, माझ्याकडे सिव्हिलचे हे सर्व कागद आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण १९० कोटी रुपये खर्च करावेत, असे शासनाने आदेश केले होते. त्याच्यापैकी आम्ही १२१ कोटीला मान्यता केली. ९० कोटी वितरित केले. तीन वर्षांत फक्त ८१ कोटी रुपये खर्च झाले. तर तीन वर्षांत जिथे ८१ कोटी रुपये खर्च होत आहेत, तिथे ४०० कोटी रुपयांचा घोटाळा कसा काय होईल? एक फुटका माणूस जळगावमध्ये आहे, त्याने ही माहिती दिली असावी.
राऊतांनी आपल्या औकातीमध्ये रहावे
पुढे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, माझे संजय राऊतांना आव्हान आहे, एक महिन्यात, दोन महिन्यात, तीन महिन्यात, चौकशी तुम्ही करा. मी बॉन्ड लिहून देतो, जर याच्यामध्ये एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार निघाला असेल आणि तथ्य निघाल, तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही. नाहीतर ते खासदारकीचा राजीनामा देतील का? हा माझा त्यांना सवाल आहे. उल्टा चोर कोतवाल को डांटे. पुण्याचे, ठाण्याचे व्यवहार तुम्ही कसे केले आहेत, हे मला माहित आहे. तुमचा व्याही कलेक्टर असताना तिकडे काय काय झाले? हे मला माहित आहे. संजय राऊतांनी आपल्या औकातीमध्ये रहावे. आमच्या तुकड्यांवर मोठा झालेला माणूस याने जास्त बोलू नये.
नेमका आरोप काय?
संजय राऊत म्हणाले होते की, माझ्याकडे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. कोरोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटिलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचे व्हेंटिलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गॅंगचे सदस्य चिमनराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबले जात आहे.
(हेही वाचा – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा : क्रस्ना डायग्नोस्टीकला शेवटची संधी)
Join Our WhatsApp Community