…म्हणून गुलाबराव पाटलांच्या भाषणावर त्यांनी घातली बंदी; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

135

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत शीतद्वंद्व सुरू असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाब्दिक फटकेबाजी करीत उद्धव ठाकरे गटाला घायाळ करून सोडले आहे. गुलाबराव पाटील ही शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ आहे. परंतु, त्यांचे भाषण आपल्यापेक्षा वरचढ होईल, या भीतीने काहींनी गुलाबरावांना शिवाजी पार्कवर भाषण करण्यास बंदी घातली होती, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी जळगावातील कार्यक्रमात केला.

( हेही वाचा : आयआयटी मुंबईमधील मुलींच्या स्नानगृहात डोकवणाऱ्या तरूणाला अटक)

शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील हे शिवसेनेची बुलंद तोफ आहेत. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. ते जेव्हा शिवाजी पार्कवर भाषण करायचे, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हायचे. परंतु, आपल्यापेक्षा त्यांचे भाषण चांगले होईल, त्यांनाच क्रेडिट मिळेल, म्हणून काहींनी गुलाबराव पाटलांचे शिवाजी पार्कवरील भाषण बंद केले होते. गुलाबराव पाटील चांगले भाषण करतात, हा त्यांचा गुन्हा आहे का, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

गुलाबाला काटे टोचण्याचे काम कुणी केले?

शिवसेनेत असताना गुलाबाला काटे टोचण्याचे काम कुणी केले, गुलाबरावांचे पाय ओढण्याचे काम कुणी केले, हे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. मंत्रिपद देतानाही काय-काय करावे लागले, याचा साक्षीदार मी स्वत: आहे. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षांत जेवढे काम केले नाही, तेवढे आम्ही अवघ्या अडीच महिन्यांत केले. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळाले, असेही शिंदे म्हणाले.

( हेही वाचा : आमदार नसतानाही वारिस पठाण मिरवताहेत ‘आमदारकीची शेखी’; गाडीवर अशोकस्तंभासह लोगो कायम)

बंड करण्यापूर्वी पाच वेळा चर्चा केली

गुलाबराव पाटील मला म्हणाले होते, आपण सर्वजण एकत्र येऊन २०१९ ची चूक दुरूस्त करू. त्यावर मी त्यांना सांगितले की, माझे त्यांच्याशी पाच वेळा बोलणे झाले आहे. आपण झोपलेल्या माणसाला जागे करू शकतो, झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करायचे तरी कसे, असे शिंदे म्हणाले.

आम्ही शिवसेना-भाजपा युती म्हणून निवडणूक लढवली होती. बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकलो होतो. शरद पवार आणि सोनिया गांधींचे फोटो लावून नव्हे. आम्ही जर हे पाऊल उचलले नसते, तर काय परिस्थिती झाली असती, हे सर्वांना माहीत आहे.

महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षांत जेवढी कामे केली नाहीत, तेवढी कामे आम्ही अडीच महिन्यात केली आहेत. आणखी दोन वर्षे बाकी आहेत. आता ते घाबरले आहेत. हा एकनाथ शिंदे सगळीकडे फिरतोय, त्यामुळे तेही फिरायला लागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.