एसटी कामगार कुणाच्या सांगण्यावरून कामावर गेले नाही, तर गुणरत्न सदावर्ते याने सांगितले म्हणून ते कामावर हजर राहिले आहेत. मी जेलमधून तसा निरोप दिला त्यामुळे कामगार पुन्हा हजर झाले, असा दावा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला. सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
लढा सुरूच राहणार
वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कामगारांना अल्टिमेटम दिला, त्यामुळे २२ एप्रिलपर्यंत एसटीचे कामगार कामावर हजर झाले होते. त्यामुळे एसटी पुन्हा सुरु झाली. मात्र तुरुंगातून बाहेर पडल्यावर सदावर्ते यांनी जो दावा केला त्यामुळे वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. सदावर्ते यांनी कष्टकऱ्यांसाठीचा माझा लढा सुरूच राहणार आहे, पुढचा लढा एसटीच्या बँकेचा असणार आहे. एसटीचे कामगार सहा महिने उपाशी राहिले म्हणून त्यांना कामावर जाण्यास सांगितले, असेही सदावर्ते म्हणाले. एसटी महामंडळातील कष्टकरी जे कामावर गेलेत ते काही कोणाच्या सांगण्यावरून गेले नाहीत. गुणरत्न सदावर्तेंनी जेलमधून सांगितले होते तूर्त कष्टकरी कर्मचाऱ्यांनी कामावर जावे. कारण माझे कष्टकरी ६ महिने दुखवट्यात होते. मी त्यांचे कोणतेही नुकसान होऊ दिले नाही, असेही सदावर्ते यांनी सांगितले.
(हेही वाचा ‘कैदी नंबर 5681’ गुणरत्न सदावर्ते १८ दिवसांनंतर कारागृहाच्या बाहेर)
Join Our WhatsApp Community