सदावर्ते करणार पोलिस व्हॅनमधून महाराष्ट्र भ्रमण? ठिकठिकाणी तक्रारी दाखल

153

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. गिरगाव न्यायालयाने त्यांना बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. पण आता सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. सदावर्ते यांच्यावर सातारा, पुण्यासोबतच कोल्हापुरातही तक्रार दाखल झाली आहे. त्यांना गुरुवारी साता-यात दाखल झालेल्या तक्रारी प्रकरणी सातारा येथे आणण्यात आले आहे. त्यानंतर आता कोल्हापूर, पुणे इथेही सदावर्ते यांना पोलिस घेऊन जाण्याची शक्यता आहे.

सदावर्ते साता-यात दाखल

ऑक्टोबर 2020 मध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत चुकीचे विधान केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या संदर्भात सदावर्ते यांना दोन वर्षांपूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले असताना, ते चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. अखेर गुरुवारी त्यांना सातारा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

(हेही वाचाः पोलीस सज्ज आहेत! मनसेच्या अल्टिमेटमला गृहमंत्र्यांचा इशारा )

कोल्हापुरातही गुन्हा दाखल

मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी बेकायदेशीररित्या पैसे गोळा केल्याचा आरोपही सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना साता-यानंतर कोल्हापूर येथेही नेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः संपामुळे एसटी कर्मचारी झाले कर्जबाजारी, सरकारला दया येणार कधी?)

साता-यात सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी

सदावर्ते साता-यात दाखल झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे साता-यातील भोसले समर्थक संतप्त आहेत. आपला संताप व्यक्त करण्यासाठीच त्यांनी घोषणाबाजी केली. तर सदावर्ते यांनी साता-यात दाखल झाल्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा दिल्या आहेत.

(हेही वाचाः ‘सिल्वर ओक’वरील हल्ला; आंदोलकांना मद्य कोणी पुरवले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.