सदावर्तेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी, किल्ला न्यायालयाचा निर्णय

154

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलनकारी एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. एसटी कर्मचा-यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा या हल्ल्याच्या कटामागे हात असल्याचा आरोप करत पोलिसांनी सदावर्ते यांना शुक्रवारी रात्री अटक केली. त्यानंतर शनिवारी सदावर्ते यांना किल्ला न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्याचा निर्णय किल्ला न्यायालयाने दिला आहे. तर इतर 109 आरोपांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचाः गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजीनामा देणार की पोलिसांवर कारवाई करणार?)

11 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकीलांकडून किल्ला न्यायालयात करण्यात आली होती. पण आता न्यायालयाने सदावर्ते यांना 11 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या काळात सदावर्ते यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत काही सबळ पुरावे हाती लागल्यास सदावर्ते यांच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदावर्ते यांच्या जामीनासाठी वकिलांकडून अर्ज करण्यात आला होता, मात्र हा निर्णय आता किल्ला न्यायालयाकडून आता फेटाळण्यात आला आहे.

109 जणांना न्यायालयीन कोठडी

शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या 109 आंदोलकांच्या देखील 14 दिवस कोठडीची मागणी सरकारी वकील घरत यांच्याकडून करण्यात आली होती. अ‍ॅड. गोयकवाड यांनी आरोपींची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांना आता जामीनासाठी अर्ज करता येणार आहे.

(हेही वाचाः पवारांच्या घरावरील हल्ल्यावरुन मुख्यमंत्री संतापले! पोलिस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश)

किल्ला न्यायालयात सुनावणी

गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी आझाद मैदान येथे शरद पवार यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला झाल्याच्या आरोपाखाली सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी सुनावणीसाठी सदावर्ते यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप घरत, तर सदावर्तेंच्या बाजूने अ‍ॅड. महेश वासवानी यांनी युक्तिवाद केला.

(हेही वाचाः मी शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे, आमच्या जीवाला धोका आहे! सदावर्तेंच्या पत्नीचा आक्रोश)

दोन्ही बाजूंनी न्यायालयात युक्तिवाद

घरत यांनी या प्रकरणी सदावर्ते यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तसेच सर्व आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. या हल्ल्याच्या कटात सदावर्ते यांचा हात असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा युक्तिवाद घरत यांनी न्यायालयात केला. त्याला उत्तर देताना वासवानी यांनी या हल्ल्याचा सदावर्ते यांच्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, सदावर्ते यांना अडकवण्यात येण्याचा हा डाव आहे. हल्ला झाला तेव्हा सदावर्ते हे मॅट न्यायालयात युक्तिवाद करत होते. त्यांना या हल्ल्याची माहिती पत्रकारांकडून मिळाली, त्यामुळे या प्रकरणात ते निर्दोष असल्याचे वासवानी यांनी न्यायालयात सांगितले. तसेच वासवानी यांनी सदावर्ते यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता.

(हेही वाचाः ‘इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट’, पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राऊतांनी राज्य सरकारलाच फटकारले)

सदावर्तेंना अटक

दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांना कलम 120-बी आणि कलम 353 सह एकूण 13 गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या कटात सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदावर्तेंवर लावण्यात आलेली ही दोन्ही कलमे अजामीनपात्र आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.