मोफत केस लढवतो सांगणा-या सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून घेतले १.८० कोटी

142

एसटीच्या संपकरी कामगारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर या कामगारांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस सदावर्ते यांची चौकशी करत आहेत. त्यामध्ये सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून १ कोटी ८० लाख रुपये घेतले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटीचे संपकरी कामगार मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. या काळात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपयांप्रमाणे १.८० कोटी रुपये गोळा केले. तशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सत्र न्यायालयात दिली. या पैशांच्या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली.

पैसे वसूल केल्याची एकही तक्रार नाही

गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन दिवसांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने सोमवारी त्यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीत सरकारी वकिलांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. यामध्ये त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये घेतल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला. सदावर्ते यांनी ज्या एसटी आंदोलकांकडून ५३० रुपये घेतले आहेत, त्यांच्यापैकी एकाने तरी तक्रार केली आहे का? मग हा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल गिरीश कुलकर्णी यांनी विचारला.

(हेही वाचा सदावर्तेंना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी)

सदावर्तेंनी रचले षडयंत्र

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. ६ एप्रिल रोजीच पवारांच्या घरावर हल्ला करायचा ठरले. सगळे षडयंत्र अॅड गुणरत्न सदावर्तेंनी रचले. १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करायचे, हे सदावर्ते संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्याने सांगत होते. पण सगळे नियोजन गुणरत्न सदावर्तेंनी केले. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पवारांच्या घरावर एसटी कामगार गेले. पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा सदावर्तेंना नागपूरमधून फोन येत होते, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.