एसटी कर्मचा-यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांची 18 दिवसांनी आर्थर रोड जेलमधून सुटका झाली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगणा-या सदावर्ते यांनी आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडं घातलं आहे. आपल्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर त्यानंतर आपण योग्य ती पावले उचलावीत, असं आवाहन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केलं आहे.
आमची हत्या झाली तर…
सदावर्ते यांनी तुरुंगातून बाहेर येताच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे. आमची जर हत्या झाली तर आमच्या हत्येनंतर आपण योग्य ती पावले उचलावीत. तसेच हत्येच्या आधी सुद्धा आपण योग्य ती कारवाई करावी. जेणेकरुन कष्टकरी एसटी कर्मचा-यांच्या आवाजाची हत्या होणार नाही, असं आवाहन सदावर्ते यांनी केलं आहे.
(हेही वाचाः ‘कैदी नंबर 5681’ गुणरत्न सदावर्ते १८ दिवसांनंतर कारागृहाच्या बाहेर)
नारायण राणेंचे मानले आभार
सदावर्ते यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुद्धा आभार मानले आहेत. राणेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, सरकारने सूड उगवू नये असे म्हणत राज्य सरकारला खडे बोल सुनावले त्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभारी आहोत, असंही सदावर्ते म्हणाले.