ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंग प्रकरणी अलाहाबाद न्यायालयाने शुक्रवारी, १२ मे रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग अर्थात वैज्ञानिक परीक्षण करण्याचा आदेश भारतीय पुरात्तव सर्वेक्षण विभागाला दिला. जिल्हा न्यायालायने कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द केला.
वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिवलिंग सापडेलली जागा सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, मुस्लिम पक्षाने मशिदीत शिवलिंग सापडले असल्याचा दावा फेटाळून लावला होता. हे शिवलिंग नसून केवळ कारंजे असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला हे प्रकरण दिवाणी न्यायालयात होते. परंतु, प्रकराणाची गंभीरता लक्षात घेऊन दिवाणी न्यायालयातून हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या ‘शिवलिंग’चा काळ कार्बन डेटिंग पद्धतीने शोधण्याची मागणी चार हिंदू महिलांनी याचिकेद्वारे जिल्हा न्यायालयात केली होती. परंतु, वाराणसी जिल्हा न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करत कार्बन डेटिंग करण्यास परवानगी दिली आहे. शिवलिंगची अखंडित वैज्ञानिक चाचणी करावी, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालायने भारतीय पुरात्तव सर्वेक्षण विभागाला दिले आहेत.
Join Our WhatsApp Community