मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला आहे. या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. तर आता पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
गुन्हा दाखल होण्याची शक्यता
आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून भारतीय दंड विधान ३५३ अन्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता एका पोलीस अधिका-याने वर्तवली आहे. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानातून बाहेर पडलेले संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले. देशपांडे यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत स्वतःच्या मोटारीतून पळ काढत असताना एक महिला पोलीस शिपाई मोटारीचा धक्का लागून पडल्या आणि त्या जखमी झाल्या आहेत.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा पोबारा
संदीप देशपांडे यांना १४९ ची नोटीस बजावून देखील त्यांनी नोटिसेचा भंग केला, तसेच पोलीस त्यांना ताब्यात घेत असताना देशपांडे यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला, म्हणून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पळ काढल्यानंतर संदीप देशपांडे यांच्याशोधासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे.
Join Our WhatsApp Community