राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर तसेच नवनीत राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी निदर्शने करायला सुरुवात केली आहे. राणा यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील अमरावतीहून मुंबईत येण्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा पठण यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. अशातच मातोश्रीच्या आसपासच्या परिसरात शिवसैनिकांनी बॅनरबाजी करत राणा दाम्पत्याला आव्हान दिल्याचे दिसतेय. या बॅनरवर हिम्मत असेल तर वांद्रे येथे येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहेत, असा मजकूर दिसतोय.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)
अशी केले शिवसैनिकांनी बॅनरबाजी
राणा दाम्पत्याने गेल्या काही दिवासांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन थेट मातोश्रीवर निशाणा साधलाय. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झाले. शनिवारी सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांसाठी मंदिर असणाऱ्या मातोश्रीसमोर हाय व्होल्टेज ड्रामा असेल की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेल्या आव्हानानंतर संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्य मध्यरात्रीच अमरावती शहर सोडून शुक्रवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली. शुक्रवारी उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल होताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला, तर दुसरीकडे काही शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाबाहेर जमल्याने दिवसभर राणा विरुद्ध सेना असा चांगलाच ड्रामा रंगल्याचे पाहायला मिळाले.
शिवसैनिकांनी दिला राणा दाम्पत्याला रोखण्याचा इशारा
राणा दाम्पत्याला अमरावतीमध्येच रोखण्याचा इशारा आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दिला होता, मात्र शुक्रवारी सकाळी राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवारी सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा पुनरुच्चार केला. अशा परिस्थितीत राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच राज्यात कायदा-सुव्यवस्था ठेवण्याचे आवाहनही त्यांना करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांची नोटीस
राणा दाम्पत्यांनी कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असे कुठलेही कार्य करू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून त्यांना 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच मुंबईत शांतता राखण्यासाठी त्यांना आवाहन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी दिली आहे. राणा दाम्पत्य शुक्रवारी सकाळी मुंबईतील आपल्या खार येथील निवासस्थानी आल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community